काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक | Dr Babasaheb Ambedkar

Jay Bhim Talk
0

काळाराम मंदिर सत्याग्रह संपूर्ण माहिती| काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक महाराष्ट्र | काळाराम मंदिर सत्याग्रह 

काय आहे काळाराम मंदिर सत्याग्रहा च्या मागचे कारण...

पंचवटीतील काळाराम मंदिर प्रवेशासाठीचा डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. या संघर्षात त्यांनी दगडांचा माराही सहन केला. मात्र, मंदिर प्रवेश न मिळाल्याने डॉ. आंबेडकर यांनी हिंदू धर्मत्यागाची घोषणा केली आणि देशाच्या इतिहासाला नवे वळण मिळाले.

काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही क्रांतिकारक घटना होती. यातून जातीव्यवस्थेच्या बुरुजाला सुरुंग लावण्याचे काम झाले. काळाराम मंदिर सत्याग्रह करण्याआधी 'बहिष्कृत भारत'मध्ये बाबासाहेबांनी झणझणीत अग्रलेख लिहिला. त्यात त्यांनी स्पष्ट नमूद केले होते की, 'काळाराम मंदिरासाठी सत्याग्रह करणं अपरिहार्य झाले आहे. आपण लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेणार. जोपर्यंत हिंदू म्हणून या समाजाचे आहोत तोपर्यंत मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे व तो आम्ही बजावूनच दम घेऊ'. 2 मार्च 1930 ला बाबासाहेबांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाची सगळी जबाबदारी दादासाहेब गायकवाड यांच्याकडे होती.

वाचा चवदार तळ्याच्या सत्याग्रहा चा इतिहास 

महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नाशिकच्या दिशेने लोक आले. ट्रकभरून लोक रोज नाशकात उतरू लागले. दोन मार्चपर्यंत आठ हजार आंदोलक सत्याग्रहात सामील होण्यासाठी दाखल झाले. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्चला सकाळी 10 वाजता एक टोलेजंग सभा भरविण्यात आली. सत्याग्रह कसा चालू ठेवायचा, कोण नेतृत्व करणार, पहिली आघाडी कोणाची असेल किती लोकांचे गट असावे अन् सगळ्यात महत्त्वाचे हे की हा सत्याग्रह अहिंसेच्या मार्गाने करायचा अशा सगळ्यांना सूचना देण्यात आली. परत तीन वाजता सभा भरली. तोपर्यंत नाशकात आणखी सात-आठ हजार आंदोलक येऊन थडकले. तीन वाजता 15 हजार लोकांची मिरवणूक निघाली. मिरवणूक गोदावरीच्या घाटाकडे वळली. एक जंगी सभा घेऊन मिरवणूक विसर्जित करण्यात आली.

बाबासाहेबांच्या आदेशाने ३ तारखेला सत्याग्रहाची सुरुवात झाली. सत्याग्रहांच्या चार तुकड्या पाडण्यात आल्या. प्रत्येक तुकडीत दीडशे सत्याग्रही होते. या तुकड्या मंदिराच्या चारी दरवाजावर सकाळपासून ठाण मांडून बसल्या. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार खंदे सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. बाबासाहेब अन् भाऊ राव हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले. यावेळी गडबड उडू नये म्हणून आयुक्त घोषाळ नाशिकला आले. त्यांनी आधी बाबासाहेबांचे मत जाणून घेतले.

बाबासाहेब म्हणाले, 'मी माझ्या लोकांना हक्क मिळवून देण्यासाठी लढा उभारला आहे, वाजवी तडजोड होत असल्यास आम्ही सत्याग्रह तहकूब करायला तयार आहोत.' सत्याग्रहाची सत्य परिस्थिती जाणून घेतल्यावर तत्कालीन आयुक्त घोषाळांनी हॉटसन साहेबांस एक पत्र लिहिले होते. त्यात नमूद केले आहे की, मी आताच नाशिकहून परतलो. मला आधी वाटत होते त्यापेक्षा हे प्रकरण खूपच गंभीर आहे. देवळाला सरळ सरळ वेढा घालण्यात आला आहे. सकाळी मला तेथे आंबेडकर भेटले. अनेकजण तेथे गीत गात होते. अधून मधून उंच आवाजात युद्ध घोषणा देत होते. तेथे स्त्रीयाही होत्या. खाकी पोषाख केलेले व हातात काठ्या घेतलेले लोक पहारा देत आहेत.

Download करा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 200+ Original Photos 

सत्याग्रह्यांचा वेष खादी व डोक्यावर गांधीटोप्या होत्या. त्या त्यांना नुकत्याच देण्यात आल्या होत्या. दर पाच दहा मिनिटांनी सत्याग्रह्यांनी भरलेल्या लॉऱ्या नाशकात येत होत्या. सत्याग्रहात अडथळा आणणारा कुठलाही हुकूम पाळला जाणार नाही, असे आंबेडकरानी सांगितले आहे. गार्डन, रेनाल्डस (पोलिस अधीक्षक) व मी सकाळी जेव्हा तेथे गेलो तेव्हा धरणे धरून बसलेल्यांपैकी कोणीच उठून उभे राहिले नाही. त्यापैकी बरेचजण खेड्यातून आलेले वतनदार आहेत. मी त्यांच्याशी बोलत असतानासुद्धा ते उठून उभे राहिले नाहित. परंतु, आंबेडकर येताक्षणीच ते उठून आनंदाने उड्या मारू लागले. त्यांना सलाम करू लागले. 'गांधीजी की जय' अशा घोषणा दिल्या. नाशिक परिसरातील सत्याग्रहींवर तेथील संवर्णानी बहिष्कार घातलेला आहे. अशा परिस्थीतीत उत्तेजण देणे म्हणजे त्यांची खरी सेवा करण्यासारखे नाही. या चळवळीचे स्वरुप धार्मिक असण्यापेक्षा, सामाजिक व राजकीय आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत पुस्तकांची pdf साठी येथे क्लिक करा.

9 एप्रिल 2930 रामनवमी. रथयात्रा निघणार होती सत्याग्रही अधिक आक्रमक होत चालले. पोलिसानी दंगल वगैरे होऊ नये म्हणून बंदोबस्त वाढविला. एकंदरीत तणाव वाढताना बघून दोन्ही कडच्या नेत्यांनी मिळून एक तात्पुरती तडजोड काढली. रथ ठेवण्याच्या जागेपासून पूर्वेच्या श्रीराम मंदिरापर्यंत रथ 'यांनी' आणायचा. तिथुन पुढे विमान सर्वस्वी सत्याग्रहींनी न्यावे अन् रथ मात्र दोघांनी मिळून ओढावा पण तसे झाले नाही. ऐन वेळी धोका झाला. वेळेच्या आधीच रथ बाहेर घाईघाईने ओढण्यास सुरुवात केली. सत्याग्रहींना चुकवून रथयात्रा काढण्याचे नियोजन होते. चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला. यावरून मिरवणूक बाजूला राहिली व मारामारी, दगडफेक झाली. तोवर बाबासाहेब प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून 'भास्कर कद्रे' नावाचा भीमसैनिक मंदिरात घुसला अन् रक्ताने माखून बेशुद्ध पडला. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वत: बाबासाहेबांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. अशा प्रकारे हा सत्याग्रह 1935 पर्यंत चालला.


आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)