भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बद्दल असणारे विचार.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आणि इतिहास वेळोवेळी सांगितला आहे. त्यांच्या भाषणात शिवाजीमहाराजांची उदाहरणे सापडतात, त्यांनी जे नियतकालिके सुरू केली त्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा उल्लेख सापडतो, बहिष्कृत भारतात उल्लेख आढळतो. बाबासाहेबांनी जे ग्रंथ लिहिले या ग्रंथात सुद्धा उल्लेख सापडतो. याचा अर्थ असा होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा गौरव वेळोवेळी बाबासाहेबांनी केलेला आहे. खाली संदर्भासहित स्पष्टीकरण दिलेले आहे.
संदर्भ 1:– मुंबई जवळील बदलापूर मध्ये 3 मे 1927 रोजी शिवजयंतीचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर एक तास भाषण केले. शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या गुणांची उकल करून दाखवली. आणि शेवटी प्रश्न उपस्थित केला, “एवढे चांगले राज्य लयास का गेले?” आणि उत्तर दिले “कारण त्या राज्याचा सर्वांनाच सारखा अभिमान नव्हता”. म्हणजेच काही लोकांना ते राज्य नको होते. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18, भाग 1, पान क्रमांक 51)
संदर्भ 2 : छत्रपती शिवाजी महाराज यांनी “जय भवानी” चा नारा दिला होता. कारण तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीच्या काळामध्ये जे पत्र लिहिलेले आहेत त्यामध्ये पत्राच्या वरी एक लोगो आहे ज्यावर “जय भवानी”लिहिलेले आहे. बाबासाहेबांच्या आई, भिमाई यांना तुळजापुरला जायचे होते, कारण त्यांचे कुलदैवत हे तुळजापूरची भवानी आई होती. परंतु अकाली मृत्यूमुळे त्यांना जाता आले नाही. कदाचित या कारणामुळे बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीच्या काळात “जय भवानी” चा लोगो वापरत असावेत.(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 21, पान क्रमांक 57, 59, 63, 52, 87)
संदर्भ 3 :– 25 नोव्हेंबर 1949, संविधान सुपूर्त करताना बाबासाहेबांनी संविधान सभेत भाषण केले, त्या भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख आढळतो. बाबासाहेब म्हणतात “भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले असे नव्हे तर ते देशातील काही लोकांच्या बेईमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते…..जेव्हा शिवाजी हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होता त्यावेळी इतर मराठा सरदार आणि रजपूत राजे मोगल सम्राट यांच्या बाजूने युद्ध लढत होते…..”. बाबासाहेबांना भारताच्या भविष्यातील स्वातंत्र्याची चिंता आहे. कारण आपल्या देशातील इतिहास सांगतो, जेव्हा परकीय लोकांनी भारतावर आक्रमण करून राज्य केले, तेव्हा येथील बेईमान आणि विश्वासघातकी लोकांनी त्यांना सहकार्य केलेले आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 3, पान क्रमांक 170)
संदर्भ क्रं. 4:– 8 मे 1955 ला मुंबई येथे बुद्ध जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ” बंधू आणि भगिनींनो , शिवाजीचे अष्टप्रधान ब्राह्मण होते, त्यांची कुळकथा निराळी आहे, ते मराठ्यांना पंगतीला जेवावयाला घेत नसत. शिवाजीने बाळाजी आवजी ला हे सांगितले, तो म्हणाला तुम्ही राज्याभिषेक करून घेतल्याखेरीज तुमचा दर्जा वाढणार नाही. शेवटी शिवाजीने सांगितले काय करावयाचे असेल ते तुम्हीच करा. मोरोपंत पिंगळे हा मुख्य प्रधान होता. तो म्हणाला ‘लेका शुद्रा तू आमचा राजा होणार !’ त्याने शिवाजीची बेईज्जत केली. शेवटी बाळाजी आवजी हा राजपुताण्या कडे गेला. तेथे त्याने शिवाजी ची वंशावळी तयार केली, आणि काशीहून ब्राह्मण आणून राज्यभिषेक करविला.” (डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 3, पान क्रमांक 454)
संदर्भ क्र. 5:– बहिष्कर भारत मधील अग्रलेखात 27 सप्टेंबर 1929 ला बाबासाहेब लिहितात “लेनिनच्या पुतळ्याला किंवा तसबिरीला मान देणाऱ्या कम्युनिस्ट पुढाऱ्यांनी शिवाजी महाराजांची तसबीर युनियन च्या कार्यालयात ठेवण्यास हरकत घेतली तेव्हा त्यांचे कित्येक मराठा अनुयायी त्यांच्यावर बिथरले, हे आम्हाला एकूण ठाऊक आहे.” (डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 20, पान क्रमांक 160)
संदर्भ क्र.6 :– ‘महार पूर्वी कोण होते’ या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकर लिहितात ” There is no doubt that the Marathas too at one time used the term ‘Johar’ as a word of salutation. It was in vogue during a part of Shivaji’s rule; and even Shivaji in the one and the only letter admitted to have been signed by him in his own hand and addressed to Maloji Ghorpade has used the word ‘Johar’ as the word of salutation.” जोहार शब्दाचा इतिहास सांगताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एकेकाळी मराठा लोकसुद्धा जोहार म्हणत असत. जोहार हा शब्द ‘योद्धार’ शब्दाचा अपभ्रंश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने पत्र लिहिले या पत्रावर त्यांची सही आहे. हे पत्र मालोजी घोरपडे यांना लिहिले होते , ज्या मध्ये शिवाजी महाराज अभिवादन म्हणून ‘जोहार’ म्हणतात. नंतरच्या कालखंडात म्हणजे पेशवाई आल्यानंतर मराठा लोक राम राम म्हणू लागले. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 17 भाग 2, पान क्रमांक 141)
संदर्भ क्रं.7 :– 1946 ला बाबासाहेब आंबेडकरांनी एक शोध ग्रंथ लिहिला ज्याचे नाव आहे, ‘शूद्र पूर्वी कोण होते?’. या ग्रंथामध्ये 12 प्रकरणे आहेत, त्यातील दहाव्या प्रकरणात ‘ब्राह्मणांनी शूद्रांना अधोगतीस कसे नेले ?’ या टायटल मध्ये प्रकरण लिहिले आहे. या प्रकरणात एकूण 14 पाने शिवाजी महाराजा वरती लिहिलेली आहेत. ज्यामध्ये.
a) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास सांगितला आहे.
b) मोरोपंत पिंगळे यांनी राज्याभिषेकाला विरोध कसा केला आणि नंतर समर्थन का केले याचे विश्लेषण यामध्ये आहे.
c) बाळाजी आवजी या कायस्थ व्यक्तीने राज्याभिषेक करण्यासाठी काय काय केले याचा सविस्तर वृत्तान्त या मध्ये आढळतो.
d) गागाभट्टाने राज्यभिषेका समयी किती कोलांट्याउड्या मारल्या, किती लाच घेतली, याचा तपशीलावर वृत्तांत यामध्ये आढळतो.
e) राजपूत लोक हे विदेशी आक्रमणकारी लोक आहेत, राजपूत हे “हुण” विदेशी लोक आहेत, असे बाबासाहेबांचे म्हणणे आहे.
f) शिवाजी महाराजांच्या वंशजांची दोन घराणी राज्य करत होती, एक साताऱ्याला आणि दुसरे कोल्हापूरला, या दोन्ही घराण्यांना ब्राह्मणांनी कसा त्रास दिला, याचा इतिहास बाबासाहेबांनी लिहिला आहे.
Download करा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 500+ जुने Original फोटो
वरील माहितीचा सारांश
बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या ग्रंथांमध्ये आणि भाषणांमध्ये व्यक्त केलेला आहे. ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पदरी असणाऱ्या ब्राह्मणांनी त्यांना कसा त्रास दिला याचे वर्णन आढळते. शिवाजी महाराजांचे राज्य अर्थात ‘शिवशाही चे रूपांतर पेशवाईत कसे झाले?’ हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर उभा करतात. महाडचा सत्याग्रह झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड किल्ल्यावर मुक्काम केलेला आहे, त्या रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी शोधली होती. तिथे मुक्काम करतात. शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जातात. हा सर्व इतिहास नव्याने आंबेडकरी आंदोलनातील कार्यकर्त्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.
Source: Dhammchakra.com / Dr. Babasaheb Ambedkar Writing and Speeches
Jay Shivray Jay Bhim
ReplyDelete