लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे लेखन साहित्य | Annabhau Sathe Writings | Annabhau Sathe

Jay Bhim Talk
3

अण्णा भाऊ साठे यांचे लेखन साहित्य | अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबऱ्या आणि त्यांची माहिती | Novels of Anna Bhau Sathe | Writings of Anna Bhau Sathe

आज आपण या आर्टिकल मध्ये अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेले सर्व साहित्य ची माहिती आणि त्यांचे Pdf ची लिंक्स download करण्यासाठीं available केलेली आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संपदेतील प्रत्येक कलाकृतीची व्याप्ती फार मोठी आहे. त्यांच्या एका-एका कथा-कादंबरीचे समालोचन करतांना ग्रंथ निर्मिती होते. एवढे गहन साहित्य आणि ज्वलंत मार्मिक विषय लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी हाताळले व शब्दबध्द केलेले आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या Download करण्यासाठीं येथे क्लिक करा 👈

अण्णा भाऊ साठे यांचे लेखन साहित्य | अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबऱ्या आणि त्यांची माहिती 

1. फकिरा :-

या कादंबरीत अण्णाभाऊंनी दलितांच्या अंगी असलेल्या झुंजारपणा, बंडखोरपणा, लढताना मरण पत्करण्याची तयारी, स्वाभिमान, गरजू आणि लायक व्यक्तींना कुठल्याही परिस्थितीत मदत करण्याची वृत्ती या उदात्त गुणांचे चित्रण केले आहे. 'फकिरा' या कादंबरीची कथा ही अण्णाभाऊंचे खऱ्या आयुष्यातील मामा श्री.फकिरा राणोजी मांग यांची जीवनकथा आहे. दुष्काळ, ताप, रोगांच्या साथी आणि उपासमार यांच्यामुळे दलित वर्गातील लोक मरू लागले होते. फकिरा यांच्या खेड्यातील विष्णुपंत कुलकर्णी यांनी दलितांना' काहीही करा पण जग' असा निर्वाणीचा सल्ला दिला. त्यांचा सल्ला आणि आपला दृढनिश्चय या बळावर फकिरा धान्याची गोदामे आणि ब्रिटिशांचे खजिने लुटतात, आणि गरजू लोकांमध्ये त्यांचे वाटप करतात. फकिराच्या या कृत्यामुळे ब्रिटिश सरकारचा एक भारतीय पोलीस बाबरखान फकिरांना अटक करण्याचा प्रयत्न करतो. पण फकिरा फरारी होतात, जंगलात आश्रय घेतात. आणि त्यांना अटक करण्याचा बाबरखानचे प्रयत्न हाणून पाडतात. यावर ब्रिटिश सरकार एक युक्ती शोधते. सरकार फकिरांच्या नातेवाईकांना अटक करते, ओलीस ठेवते व त्यांचा छळ करते. आपल्याकरिता आपल्या नातेवाईकांचा छळ सहन न होऊन फकिरा शरण येतात. नंतर ब्रिटीश सरकार त्यांना फासावर चढवतात ते फाशी जातात पण आपल्यामागे एक अमर अशी प्रेरणादायक कहानी ठेवून जातात. अण्णाभाऊंची ही कादंबरी अतिशय लोकप्रिय झाली. वि.स. खांडेकर यांच्यासारख्या जाणत्या साहित्यीकानेही तिचा भरभरून गौरव केला. 1961 साली या कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला. या कादंबरीवर' फकिरा' नावाचा चित्रपटही निर्माण झालेला आहे.

2. मास्तर :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कादंबरीत संपूर्ण श्रध्देने आणि त्यागी वृत्तीने स्वातंत्र्यलढ्यात उडी घेणाऱ्या देवगावच्या एका बंडखोर शिक्षकाचे जीवन अण्णाभाऊंनी चित्रित केले आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांती करणे आवश्यक आहे. अशी मास्तरांची श्रध्दा असते. ते सातारा जिल्ह्यातील लोकांना व विशेषतः तळागाळातील लोकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करतात. मास्तरांना आपल्या कुटुंबासाठी ही वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन होते. आपण तुरुंगातून सुटून येण्याची शक्यता कमी असल्यामुळे ते मालन नावाच्या आपल्या दुसऱ्या पत्नीला दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करून संसार थाटण्याचा सल्ला देतात. त्याप्रमाणे ती दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न करते. पण त्यानंतर तेराच दिवसांनी तुरुंगातून त्यांची सुटका होते. मात्र ते मालनला कायमचे पारखे होतात. ही मास्तरांची शोकांतिका हे या कादंबरीचे कथानक आहे. असे विशद केलेले आहे.

3. टिळा लावते मी रक्ताचा :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कादंबरीला 'आवडी' असेही शीर्षक आहे. जातिभेद मानणाऱ्या पूर्वीच्या महाराष्ट्रात धनाजी रामोशी या आपल्यापेक्षा हलक्या जातीच्या तरुणाबरोबर राहण्याचे धाडस करणाऱ्या आवडी चौगुले या वरच्या जातीतील मुलीची ही कथा आहे. आवडीचा भाऊ नागू हा तिचा अपमान करण्यासाठी मुद्दाम तिचे लग्न बोरगावच्या एका श्रीमंत घराण्यातील उत्तम भगवानराव पाटील याच्याशी लावून देतो. उत्तम हा फिट्स येणारा रूग्ण आहे. त्याला फिट्चा झटका आला तो हाती येईल त्या वस्तूचे दोन तुकडे करत असतो. हे काही वेळानंतर आवडीच्या लक्षात येते. अशा गोष्टी निमूटपणे सहन करण्याचा उच्चवर्णियात रिवाजच असतो. पण आवडी मात्र याविरुध्द बंड करते आणि हलक्या जातीच्या धनाजीबरोबर निघून जाते. धनाजीपासून तिला गर्भ राहतो. यामुळे नागू प्रचंड संतापतो. हलक्या जातीच्या माणसाची पत्नी बनून तिने आपल्या घराण्याला कलंक लावला आहे असे त्याला वाटते. त्यामळे ती जेव्हा आपल्या नातेवाईकांना भेटायला येते तेव्हा नागू तिचा खून करतो. आपल्या पत्नीच्या खूनाचा बदला घेण्याचे धनाजी ठरवतो. एका खूनाच्या आरोपात धनाजीला चौदा वर्षाची तुरुंगावासाची शिक्षा होते. तुरुंगवासाची शिक्षा भोगून आल्यावर तो ज्या ठिकाणी नागूने आवडीचा खून केलेला असतो, त्याच ठिकाणी धनाजी नागूचे प्राण घेतो. या कादंबरीतून जातिभेदाच्या भिंती नष्ट करण्याची अण्णाभाऊंची विचारसणी स्पष्ट होते. या कादंबरीवर 'टिळा लावते मी रक्ताचा' हा चित्रपट 1961 मध्ये प्रदर्शित झाला आहे. असे विशद केलेले आहे.

4. चिखलातील कमळ :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, महाराष्ट्रातील पाली जेजुरी आणि कर्नाटकातील सौंदत्ती या गावांमध्ये खंडोबा व देवताला मुलगी अर्पण करण्याच्या धार्मिक प्रथेचे दुष्परिणाम यांचे चित्रण आले आहे. या मुली खंडोबाला संतुष्ट करण्यासाठी त्याला 'वाहिल्या' जातात आणि त्यांचे लग्न खंडोबाशी झाले आहे असे समजले जाते.

अशा मुलीला 'मुरळी' म्हणून ओळखले जाते. प्रत्यक्षात मात्र त्या धर्माच्या नावाखाली शरीरविक्री करणाऱ्या वेश्याच असतात. त्यांच्याप्रमाणेच खंडोबाला अर्पण केलेल्या पुरुषांशी त्यांचे शरीरसंबंध असतात. अशा पुरुषांना 'वाघ्या' असे म्हणतात. वाघ्या आणि मुरळी खंडोबाची स्तवने गातात आणि नृत्य करतात. मुरळ्यांना कुठलीही सुरक्षितता नसते. पुरुष त्यांच्याशी गैरवर्तन करतात. अखेर अनाथ व दरिद्री जीवन जगणे हेच मुरळ्यांच्या नशिबी. महषी वि.रा. शिंदे यांनी मुरळी प्रथेला कडाडून विरोध केला होता आणि 'मुरळी प्रतिबंधक संस्था' ही निर्माण केली होती.

या कादंबरीत आई तुळसा व मुलगी सीता या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. मुरळ्यांभोवती ती देहिकतेचा चिखल असला तरी हृदयाने त्या चिखलातून उगवणाऱ्या कमळाप्रमाणे निर्मह, शुध्द व पवित्र असतात, असे या कादंबरीचे शीर्षक सुचवते. या कादंबरीवर 'मुरळी मल्हारी रायाची' हा चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला आहे. असे विशद केलेले आहे.

5. आकृती :

यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, 'चित्रा' या कादंबरीचे शीर्षक कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा चित्रा हिच्यावरून देण्यात आले आहे. या कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊंनी लिहिले आहे की ही कादंबरी जरी काही वाचकांना अवास्तव वाटण्याची शक्यता असली तरी ही एक सत्यकथा आहे. ही कादंबरी एकप्रकारे 1946-46 च्या मुंबईसारख्या शहरांच्या औद्योगिकीकरणाचे दोष व त्यांचे लोकांच्या लैंगिक नीतिमत्तेवर होणारे परिणाम दाखवते. औद्योगिकीकरणाच्या वाढीबरोबरच शरीरविक्रीचा व्यवसायही कसा वाढला आणि कशा प्रकारे हजारो निष्पाप स्त्रियांना दलालांकडून बळी बनवण्यात आले, याचे चित्रण ही कादंबरी करते. पैशाच्या आकर्षणामुळे काही अगदी जवळचे नातेवाईकही आपल्या नात्यातील महिलांना या व्यवसायात जाण्यात भाग पाडीत असत. चित्राची कथा एका अभागनींपैकी एकीची कथा आहे. असे विशद केलेले आहे.

6 रत्ने:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पत्नीचे जीवन कसे असुरक्षित असते याचे चित्रण या कादंबरीत आले आहे.

7. संघर्ष:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही कादंबरी म्हणजे 'सुलभा' आणि तिचा प्रियकर 'आनंद' यांच्यामधील प्रेमाची कथा आहे. 'सुलभा' आणि 'आनंद' अगदी लहानपणापासून एकमेकांवर प्रेम करत असतात. पण सुलभाच्या वडिलांचे आनंदच्या वडिलांशी वैर असते. त्यामुळे सुलभाचे वडील मुद्दाम तिचा विवाह दिल्ली येथील आयकर कार्यालयात नोकरी करीत असलेल्या बाबासाहेब यांच्याशी लावून देतात. बाबासाहेब अतिशय तापट स्वभावाचे व हेकट असतांना. त्यामुळे सुलभा त्यांच्याशी घटस्फोट घेते. ती परिचारिका बनते आणि भारतीय सेनेत परिचारीका म्हणून काम करू लागते. आनंद सैन्यात भरती झालेला असतो. तो लढाईत जखमी होतो. सैन्याच्या रुग्णालयात सुलभाची आनंदशी भेट होते. त्यांचे पूर्वीचे प्रेम पुन्हा बहरते. शेवटी दोघांचा विवाह होतो. सुलभा आणि आनंद या प्रमुख व्यक्तिरेखा आपल्या व्यक्तिगत आणि भावनिक अशा दोन आघाड्यांवर संघर्ष करीत असतात. असे विशद केलेले आहे.

8. रूपा 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी. या कादंबरीत नायक, नायिका आणि खलनायक असा प्रेमकहाणीतील नेहमीचाच त्रिकोण आहे. 'दिनकर' हा नायक, 'रुपा' ही नायिका आणि 'गजानांगर' हा खलनायक आहे. 'मथीबाई' ही बाजू बदलणारी व्यक्तिरेखा आहे. सुरुवातीला ती गजाला रुपाच्या प्राप्तीसाठी मदत करते. पण परिस्थिती व आलेले अपयश यामुळे पुढे ती बाजू बदलते आणि 'दिनकर' व 'रुपा' यांना मदत करू लागते. 'दिनकर' व 'रुपा' यांना लग्न करायचे असते आणि शेवटी ते आपली इच्छा पूर्ण करतात. असे विशद केलेले आहे.

9. गुलाम:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, एका जमीनदाराच्या पदरी असलेला आणि वेठबिगारी म्हणून काम करणाऱ्या मजराबद्दल त्या जमीनदाराच्या मुलीला प्रेम वाटत असते. या प्रेमामुळेच त्याची गुलामगिरी संपते. हा या कादंबरीचा विष्य आहे. हा एक वयस्कर माणूस जमीनदार रावसाहेब यांच्याकडे वेठबिगारीवर काम करत असतो. त्याला एकदा खूप ताप येतो. अंगात ताप असतानाही रावसाहेब त्याला शेत नांगरायला सांगतात. तापाने फणफणलेला सदू ते काम करतानाच मरण पावतो. तेव्हा जमीनदार सदूचा मुलगा वासू यालाही वेठबिगार बनवतात. पण रावसाहेबांची एकुलती एक कन्या मिनाक्षी त्याच्याशी शरीरसंबंध ठेवते. 'मिनाक्षी' व वासू यांचा लग्न करण्याचा विचार असतो, पण मथी नावाची एक दूसरी तरुणी वासूच्या प्रेमात आहे असे मीनाक्षीला समजते. तेव्हा मचीच्या समाधानासाठी मीनाक्षी मथीशी लग्न करण्याची परवानगी देते आणि त्याची वेठबिगारीतून मुक्तता करते. असे विशद केलेले आहे.

10. वारणेच्या खोन्यात व अग्निदिव्य :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कादंबऱ्यांचे वर्गिकरण आपण 'साहसाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या' यात केले आहे. पण त्याही प्रेमकथाच आहेत. असे विशद केलेले आहे.

11. माकडीचा माळ :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कादंबरीचे वर्गिकरण ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या यात केले असले तरी ती प्रेमकथाच आहे. असे विशद केलेले आहे.

12. वैर :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही कादंबरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जमीनदारी पध्दत, सामान्य माणसाची पिळवणूक आणि जमीनदारांची जुलुमजबरदस्ती यांचे चित्र केलेले आहेत. येळापूर गावातील 'गोपाळराव इनामदार' या जमीनदाराचे आपल्या संपूर्ण गावाशीच वैर असते. काही खलप्रवृत्तीच्या गुंडाच्या साहाय्याने तो गावकऱ्यांना चिरण्याचा प्रयत्न करतो. ज्या गावात आपण राहतो त्या संपूर्ण गावाशी वैर करणे हे धोकादायक व चुकीचे आहे. याची जाणव त्याला शेवटी फार उशिरा होते आणि त्याचवेळी त्याचाच एक साथीदार त्याला ठार करतो. असे विशद केलेले आहेत.

13. रानबोका

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, सुरळ गावातील काही वाईट प्रवृत्तीचे लोक कोंबड्या, बकऱ्या किंवा असेच निष्पाप प्राणी मारणाऱ्या रानबोक्याच्या स्वभावाचे असतात. त्यांचे चित्रण या कादंबरीत आले आहे. म्हणून लेखकाने या कादंबरीला 'रानबोका' हे नाव दिलेले आहे. ज्यांना या रानबोक्यांचा उपद्रव होतो अशा लोकांकडून कधी ना कधी तरी हे रानबोके त्यांच्या अमानुष कृत्यांसाठी ठार मारले जातात हा अनुभव लेखकाने यात मांडला आहे. समाजातील विकृतप्रवृत्तीचे चित्रण अण्णाभाऊंनी या कादंबरीतून रेखाटले आहेत.

या कादंबरीत 'मोहना', 'संभाजी चौगुले' आणि 'लक्ष्मी' असा प्रेमाचा त्रिकोण आहे. मोहना ही तमाशातील एक नर्तकी असते. संभाजी चौगुले हा 'चिमाबाई चौगुले' यांचा एकुलता एक मुलगा असतो. आपला मुलगा तमाशातल्या मोहना या नर्तकीवर अनुरक्त झाला आहे हे चिमाबाईच्या लक्षात आल्यावर चिमाबाई संभाजीचे लग्न लक्ष्मीशीही ठरवतात. पण मोहनाने संभाजीला लक्ष्मीबरोबर लग्न करण्याची परवानगी देऊन स्वतःच्या प्रेमाचा त्याग केलेला असतो. याची लक्ष्मीला जाणीव झाल्यानं ती संभाजीला मोहनाशी दुसरे लग्न करण्याची लेखी अनुमती देते. असे विशद केलेले आहेत.

14. पाझर :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कादंबरीत 'अकुबा' आणि 'तुकोबा' हे गावगुंड असतात. त्यांच्या गुंडपणामुळे पारगाव नावाच्या खेड्यात लोक त्रस असतात. पण यामुळेच खेड्यातील लोकांना त्रस्त खेडूतासाठी मायेचा पाझर फुटतो. ते या गुंडाचा पराभव करतात आणि त्यांच्या गुंडगिरीच्या काळात मायेला आटलेला पाझर पुन्हा वाहू लागतो. या कादंबरीत चंद्रा आणि नाना यांच्या प्रेमाचे व विवाहाचेही चित्रण आलेले आहे. असे विशद केलेले आहे. असे विशद केलेले आहे.

15. बंडवाला 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कथेत एक इनामदार एका साध्याभोळ्या मांगाची 80. विघे जमीन अगदी लहानशा रकमेसाठी गहाण म्हणून ठेवून घेतो. दोन पिढ्यांपर्यंत ती जमीन इनामदारांच्या ताब्यात राहते. ज्या मांगाने ही जमीन गहाण ठेवलेली असते, त्याचा नातू तात्या ही जमीन इनामदाराच्या कचाट्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि अन्यायाविरुध्द उभा राहतो. या प्रयत्नामध्ये दोन वेळा इनामदाराला मारहाण करण्याच्या आणि त्याचा खून करण्याच्या खोट्या आरोपाखाली तर तात्याला तुरुंगवास सहन करावा लागतो. जमिनीचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी सारे मवाळ व कायदेशीर मार्ग जेव्हा व्यर्थ ठरतात. तेव्हा शेवटी तात्या बंडखोर बनतो. असे विशद केलेले आहे.

16. वळण :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, डॉ. आंबेडकरांनी दलितांना मेलेल्या ढोराचे मांस खाणे यासारख्या घाणेरड्या सवयी सोडून देण्याचे आवाहन केले होते. पण या सवयींचे वहण खोलवर रुजले असल्यामुळे ते सोडणे बऱ्याच दलितांना अवघड वाटत होते याचे चित्रण या कथेत आले आहे. दलि समाजाचे वास्तवीक जीवन पध्दती मांडलेले आहेत.

17. विष्णुपंत कुलकर्णी :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, 'विष्णुपंत' हे साधारणपणे मवाळ वृत्तीच्या ब्राह्मण समाजाचे असले तरी 1918 मधील दुष्काळ आणि रोगराई यांच्यामुळे होणारे दलितांचे हाल पाहून ते दलितांना क्रांतिकारी सल्ला देतात. 'काहीही करा पण जगा! तुम्ही साऱ्यांनी जगायलाच हवं!" ते दलितांना मराठीत धान्य लुटून जगण्याचा मार्ग सुचवतात. दलित ते धान्य लुटतात. यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवला जातो आणि त्यांना अटक होते. पण विष्णूपंत सरकारविरुध्द लढतात आणि अटक केलेल्या दलितांना मुक्त करायला लावतात. असे विशद केलेले आहे. सामाजिक क्रांतीची जाणीव या कादंबरीतून व्यक्त होते. तसेच तत्कालीन सामाजिक व राजकीय वास्तवता स्पष्ट झाल्याचे दिसून येते.

18. भोसक्या:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही भारतीय संस्कृतीचा एक निराशाजनक पैलू दाखविणारी कथा आहे. भारतीय संस्कृती ही सात्त्विक पवित्र आहे असे काही लोक प्रतिपादन करतात. पण अण्णाभाऊ या मताशी पूर्णतया सहमत नाहीत. त्यांना हा विचार अवाजवी उदात्तीकरणाचा वाटतो. कारण या देशात लाखो लोक दारिद्र्यात आणि अनेक प्रकारच्या गुलामगिरीमध्ये भरडून निघताना, अण्णाभाऊंनी पाहिले होते व पाहत होते. त्यांना जरी 'माणसे' म्हटले जाते. तरी त्यांना समाजात काहीही स्थान नसते. हा अण्णाभाऊंचा दृष्टीकोन या कथेतून व्यक्त झाला आहे. असे विशद केलेले आहे.

19. रामोशी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी. या कथेत उद्दाम जमीनदारांकमधील भांडणामध्ये गरीब, प्रामाणिक व निष्पाप लोकांचे जीवन कसे भरडून निघते आणि त्यामुहे होणारा छळ संवेदनशील सामान्य माणसाला कायदा हातात घ्यायला कसा भाग पाडतो याचे चित्रण आले आहे. माळवण वा गावचा प्रामाणिक राखणदार यदू रामोशी आपल्या एकुलत्या एक खंडू या मुलाचा तात्या डोंगरे हा खून करतो. यदू रामोशी याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो. तात्या फरारी होतो. तात्याचे नातेवाईक सरकारी यंत्रणेचे हात आले करतात. यामुळेच सरकारी यंत्रणेवरचा यदूचा विश्वास उडून जातो. तो हातावर हत्यार घेऊन जंगलात फरारी झालेलया तात्याला जंगलातच मारून टाकतो. असे विशद केलेले आहे. जमीनदाराच्या छळाला, त्रासाला कंटाळलेला उपेक्षित समाज टोकाची भूमिका का घेतो, त्याविषयीचे आत्मजाणीव त्यांच्या कथेतून व्यक्त झालेल्या आहेत.

20. चला:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही एक दुर्दैवी पण कष्टमय परिस्थितीतही निराश न होता तिला उपद्रव्य देणाऱ्यांना धाडसाने धडा शिकवणाऱ्या व बदला घेणाऱ्या मुलीची कथा आहे. असे विशद केलेले आहे.

21. मेलेला लखपती :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, 'लखपती' म्हणून ओळखला जाणारा हा माणूस प्रत्यक्षात इतका गरीब असतो, की जगण्यासाठी त्याला दगड फोडण्याचे काम करावे लागत असते. परंतु त्याच्या गरिबीची थट्टा करण्यासाठी लोक त्याला 'लखपती' म्हणत असतात. तो दारुडा असतो. होळीच्या दिवशी प्रमाणाबाहेर दारु प्यायल्यामुळे तो होळीजवळ मेल्याप्रमाणे पडतो. तो मला आहे असे समजून काही माणसंरूपी भूतं होळीच्या अग्नीतच दहन करायचे ठरवतात. पण जाळला जाण्याच्या बेतात असतानाच त्याला शुध्द येते आणि इतरांप्रमाणेच तोही बोंब मारू लागतो. असे विशद केलेले आहे.

23. निखारा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही कथा एका गावातील वाद मिटवण्यासाठी कसा विनोदी निर्णय घेतला याचे चित्रण करते. एका खेड्यात नेहमीप्रमाणे एकमेकीच्या विरुध्द असलेले दोन गट आहेत. एक चव्हाणाचा व दुसरा खोताचा गट असतो. एका मुलीवरून दोन गटात एकदा वाद सुरु होतो. तेव्हा या दोन गटांपैकी वरचढ कोण हे ठरवण्यासाठी एकजण एक गमतीशीर मार्ग सुचवितो. तो सुचवतो की चव्हाणांच्या गटातील सर्व पुरुषांनी खोताच्या गटातील आपल्या वयाच्या पुरुषांशी कुस्त्या खेळाव्यात. ज्या गटातील विजयी पुरुषांची संख्या अधिक तो गट वरचढ म्हणून जाहीर केला जावा. या निर्णयामुळे अनेक हास्यकारक प्रसंग उद्भवतात. असे विशद केलेले आहे.

23. रेडं झुंज :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, मुंबईत दुधाचा व्यवसाय करण्यासाठी उत्तर प्रदेशातून आलेल्या सुकर्ण आणि बाबालाल या दोन भय्यांमधील व्यावसायिक आणि भांडवलदारी स्पर्धेचे चित्रण या कथेत आले आहे. या स्पर्धेमुळे हे दोघेजण एकेक रेडा पाळतात. आपल्या रेड्याच्या माध्यमातून एकमेकांचा पराभव करण्याचा त्यांचा इरादा असतो. म्हणून या रेड्यांची एक लागडी पुलावर ते झुंज लावतात. ते रेडे इतक्या जोराने झुंजतात की त्यांच्या वजनदार हालचालीमुळे तो लाकडी पूल मोडतो. दोन्ही रेडे खालून वाहत असलेल्या नदीतील खडकावर आपटतात आणि तिथल्या तिथे मरून पडतात. असे विशद केलेले आहे.

24. राणी :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, भाऊ पैलवान, मारुती रामोशी आणि राणी असा प्रेमाचा त्रिकोण या कथेत आहे. राणी व भाऊ पैलवान यांचे एकमेकांवर प्रेम आहे. मारुतीच्या उद्धटपणामुळे भाऊ पैलवानाकडून त्याचा खून होतो. राणी व भाऊ पैलवान यांचे प्रेम इतके उत्कट असते की खुन्याला पकडण्याची वेळ येते तेव्हा भाऊ व राणी दोघेही एकमेकांना पुढील त्रासापासून वाचविण्यासाठी खुनाचा आरोप आपल्याला घेऊ पाहतात. असे विशद केलेले आहे.

25. रंभा:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही एक सुंदर ग्रामीण तरुणी आहे. ती 'मीरा' नावाच्या देखण्या तरुणीच्या प्रेमात पडते. मीरा हा पुरुष असूनही तमाशात नाच्याची भूमिका करत असतो. 'रंभा' ही मीराच्या पिळदार शरीरामुळे त्याच्याकडे आकर्षित झालेली असते. तिचे त्यावर इतके उत्कट प्रेम असते की वेळ आल्यावर ती आपले घर आणि आपले आईवडील यांना सोडून त्याच्या मागे जाते. असे विशद केलेले आहे.

26. बोलकं मुंडकं :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही कथा प्रेमभंगामुळं उद्धवस्त आणि वेडा झालेल्या एका तरुणाची कथा आहे. 'पिऱ्या' नावाचा एक तरुण गुणी नावच्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडतो. पण त्याचे प्रेम यशस्वी होत नाही. त्यामुळे तो 'ताऱ्या' नावाचे वाद्य वाजवीत, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढीत गावात भीक मागत फिरू लागतो. गावातील पोरे सारे त्याची थट्टा करू लागतात. त्याला दगड मारतात. यामुळे वैतागून आणि दगडांचा त्रास वाचविण्यासाठी पिऱ्या नदीकाठच्या वाळवंटात आपले मानेपर्यंत शरीर पुरून घेतो. गावकऱ्यांना जेव्हा वाळूतून वर आलेले फक्त एक मानवी मुंडके वर आलेले दिसते, आणि ते बोलते आहे हे त्यांच्या लक्षात येते तेव्हा त्याला बोलकं मुंडकं असे म्हणू लागतात. असे विशद केलेले आहे.

27. डोळे :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही एक तरुणीची शोकात्म कथा आहे. मानेवाडीच्या 'गीता' या विवाहित तरुणीचे डोळे खूप सुंदर असतात. ती सुंदर असल्याने तिच्या चारित्र्याबद्दल तिच्या नवऱ्याला संशय असतो. या संशयापोटी तिचा नवरा आणि सासरचे लोक तिचा फार छळ करतात. एक दिवस ती आपले सासर सोडून आपल्या माहेरी येते आणि जाणूनबुजून आपल्या डोळ्यात विष घालते. तिची दृष्टी जाते. आपले सुंदर डोळे हेच आपल्या जीवनातील त्रासाला आणि नवऱ्याच्या संशयाला कारणीभूत आहेत. या जाणिवेने ती हे अघोरी कृत्य करते. असे विशद केलेले आहे. म्हणून सौंदर्य हे स्वीसाठी शापित असल्याचे दिसून येते.

28. पाझर :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, स्वीच्या हृदयाला पाझर कसा फुटतो हे सांगणारी ही कथा आहे. एका परक्या मुलाची आई त्याच्या बालपणीच मरण पावलेली असते. ते गोड मूल या स्त्रीलाच आपली आई मानते. त्यावेळी तिच्या अंतःकरणात प्रेमाचा पाझर फुटतो. असे विशद केलेले आहे.

29. वारणेच्या खोऱ्यात :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी. या कादंबरीला 'मंगला' असही शीर्षक आहे. या कादंबरीत अण्णाभाऊंनी १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनात हौतात्म्य पत्करणारा तरुण स्वातंत्र्यसैनिक हिंदुराव उर्फ राजाराम पांडूरंग पाटील जावळेकर आणि प्रेयसी मंगला यांच्या शोकांतिकेची कथा सांगितली आहे. असे विशद केलेले आहेत.

30. अग्निदिव्य:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कादंबरीला 'धुंद' असेही शीर्षक आहे. ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या उदात्त जीवनाचे आणि पराक्रमाचे चित्रण करणारी ऐतिहासिक कादंबरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू आदिलशहा याचा सेनापती बहेलोखान याच्याशी झुंज देऊन त्याला आपल्या साहसाने व चातुर्याने कसे पराभूत केले वाचे रोमहर्षक चित्रण अण्णाभाऊंनी या कादंबरीत केले आहे. पळून जाणाऱ्या बहेलोखानला ठार मारण्याच्या प्रयत्नात प्रतापराव कशा प्रकारे हौतात्म्य पत्करतात याचे वर्णन या कादंबरीत आहे. असे विशद केलेले आहे.

31.वैजयंता:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, तमाशा कलावंतांच्या समस्या या कादंबरीचा विषय अआहे. तमाशा कलावंतांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते, त्या समस्या या कादंबरीत स्पष्टपणे चित्रीत करण्यात आल्या आहेत. 'वैजयंता' ही तमाशा कलावंताच्या समस्यांवरील पहिली कादंबरी आहे. तामाशातील महिला कलावंताचे कशा प्रकारे लैंगिक, आर्थिक, सामाजिक आणि भावनिक शोषण केले जाते आणि कशा प्रकारे बऱ्याच स्त्री-कलावंत या व्यवसायत केवळ नाइलाजामुळे येतात याचे चित्रण 'वैजयंता' मध्ये करण्यात आलेले आहे. या कादंबरीवर 'बारा गावचं पाणी' हा चित्रपट 1961 मध्ये प्रदर्शीत झाला आहे. असे विशद केलेले आहेत.

32. चंदन:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कादंबरीमध्ये अण्णाभाऊंनी मुंबईतील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या 'चंदन' नावाच्या एका कामकरी स्त्रीच्या साहसाचे वर्णन केले आहे. चंदनचा पती मरण पावतो. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यासाठी काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक टपलेले असतात. आपल्या शिल रक्षणासाठी ती या लोकांविरुध्द लढा देते. मराठी साहित्यात कामकरी स्त्रीचे असे चित्रण प्रथमच चित्रीत केल्याचे दिसून येते.

33. अलगूज :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, अलगूज ही कादंबरी रंगू आणि तिचा प्रियकर बापू खरवटे यांची प्रेमकहाणी आहे. 'रंगू' ही गणू मोहिते नावाच्या सधन व कुलीन शेतकऱ्याची मुलगी असते. उलट, बापू गरीब असतो आणि तो मोहितेच्या घरी एक नोकर म्हणून काम करत असतो. पण रंगूला बापूचे अलगूज वाजवण्याचे कौशल्य फार आवडते. त्यामुळे ती त्याच्या प्रेमात पडते. त्याच्या मार्गात अनेक अडचणी येतात. पण त्या सर्व अडचणींना पार करून शेवटी 'रंगू' आणि 'बापू' लग्न करण्यात यशस्वी होतात. 'ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड' असे सुचवणारी ही अण्णाभाऊंची पहिली सुखान्त कादंबरी आहे. या कादंबरीवर 'अशी ही साताऱ्याची तन्हा' या नावाचा चित्रपट 1974 मध्ये निघाला आहे.

34. अहंकार :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, अवाजवी अहंकार स्त्रीचे आयुष्य कसे उद्धवस्त करतो हा या कादंबरीचा आशय आहे. 'अवंतिका' ही या कादंबरीची नायिका आहे. तिचे पालनपोषण तिचे मामा आबासाहेब इनामदार यांनी केलेले असते. आबासाहेबांचा मुलगा 'रामराव' आणि 'अवंतिका' एकमेकांवर प्रेम करत असतात. एकदिवस रामराव अवंतिकेजवळ शरीरसुखाची मागणी करतो. तेव्हा अहंकारी अतिका त्याचा अपमान करते. त्यामुळं तिचे वडील जेव्हा रामरावांपुढे अवंतिकेशी विवाहाचा प्रस्ताव ठेवतात. तेव्हा तो प्रस्ताव रामराव झिडकारतो. वास्तविक तिने रामरावाला नम्म्रपणे नकार दिला असता तरी चाचले असते. अहंकारी वृत्तीने नकार देण्यामुळे तिच्या अहंकारी स्वभावानेच तिला संकटात टाकले आहे. एखाद्या व्यक्तीला सुखी जीवन जगायचे असेल तर तिने आपला अहंकार मर्यादित ठेवून नम्रतेने वागायला हवे असे या कादंबरीतून अण्णाभाऊंनी विशद केलेले आहेत.

35 . स्ट्रोक:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, 'शाम' आणि 'रोझी' यांच्या प्रेमाची ही कहाणी. त्यांच्या नोंदणी विवाहापाशी संपते. या कादंबरीत मुंबईतील एका झोपडपट्टीचे विविध पैलू चित्रित करण्यात आले आहेत. हे पैलू म्हणजे गुन्हेगारी, ईर्ष्या, नीचपणा आणि त्यासोबत माणुसकी व सहयता. चित्रकार शाम हा या कादंबरीचा नायक आहे. तो मुंबईत येऊन आपल्या कुटुंबासह एका झोपडपट्टीत राहू लागतो. पेंटर म्हणून काम करतो. आपल्या कुटुंबापुरते कमावतो व आनंदात जगत असतो. शामच्या शेजारी राहणारी ताकवाली नावाची एक बाई चारित्र्याने सेल असते. ती स्त्रीसुलभ मत्सरापोटी शामच्या बायकोला जाळून मारते. याचा शामच्या मनावर आघात होतो. पण तरीही त्याच्या पत्नीचे रोझीचे प्रेम या आघातावर मात करून त्याचे सामान्य जीवन तो नेहमीप्रमाणे सुरू करण्यामध्ये मदत करते. असे विशद केलेले आहे.

36 मोर:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, 'मयूरा' ही साधी सरळ साचेबंद प्रेमकथा आहे. मयूराचे नाव निलीमा असते. पण तिला मोर खूप आवडत असल्यामुळे, तिच्या वडिलांनी तिचे नाव 'मयूरा' असे ठेवलेले असते. चंदन नावाचा एक गरीब मुलगा असतो. मयूराचे वडील खूप श्रीमंत असतात. तरी या दोघांचे परस्परांवर खूप प्रेम असते. ते दोघे लग्न करतात. अशी मयूरा कादंबरीची कहानी आहे. असे विशद केलेले आहे.

37. माकडीचा माळ :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, अण्णाभाऊ साठे यांची 'माकडीचा माळ' ही कादंबरी सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक आहे. मराठी साहित्यात प्रथमच सुगीच्या दिवसांमध्ये खेड्यांच्या बाहेर एखाद्या टेकडीवर किंवा माळावर पाले उभारून त्याच्यामध्ये राहणाऱ्या भटक्या जातीजमातींचे अत्यंत प्रमाणिक, समर्थ आणि जिवंत चित्रण या कादंबरीत करण्यात आले आहे हे या कादंबरीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य होय. अण्णाभाऊंनी सूक्ष्म निरीक्षणातून अतिशय बारकारईने या भटक्या लोकांची जीवनपध्दती, त्यांचे संघर्ष, त्यांची दुःखे, त्यांच्यातील प्रेमप्रकरणे, त्यांची नितिमत्ता, व्यवसाय, रीतिरिवाज, दंडक यांच्यामधील पोटजाती आणि सुस्थिर समाजाच्या त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन यांचे चित्रण केले आहे. पारंपारिक मराठी साहित्याच्या वाचकासाठी ग्रामीण भागातील भटक्यांचे या कादंबरीत चित्रण पूर्णपणे नवीन आहे. या कादंबरीत 'यंकू' या माकडवाल्याची मुलगी दुर्गा आणि सख्या नावाच्या माकडवाल्याचा मुलगा 'येमू' यांच्यातील प्रेमाचे उत्कट चित्रण केलेले आहे. 'दुर्गा' आणि 'येमू' यांना अडचणीतून जावे लागते, अशा एके रात्री पाऱ्या नावाच्या खलनायकाने चिथावून पाठवलेल्या दोन चोरांशी लढताना यंकूचा कसा मृत्यू होतो याचे चित्रण या कादंबरीत आले आहे. या कादंबरीवर 1969 साली 'डोंगरची मैना' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

38. डोळे मोडीत राधा चाले :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, संत एकनाथ यांच्या 'वारियाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले' या प्रसिध्द गवळणीच्या ध्रुवपदातून या कादंबरीचे शीर्षक घेण्यात आले आहे. स्त्रीच्या वागणुकीतील मोकळेपणाचा ग्रामीण खलप्रवृत्तीचे लोक कसा विपरीत अर्थ लावतात याचे चित्र या कादंबरीत रेखाटले आहे. यामुळे अनेक स्त्रियांच्या आणि लोकांच्याही जीवनात कसा अनर्थ निर्माण होतो आणि कशा दुःखद घटना घडतात याचे चित्रण या कादंबरीत आले आहे.

39 कुरूप:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, 'कुरूप' या शब्दाचा या कादंबरीतील अर्थ चिघळलेली जखम असा आहे. या कादंबरीची कथा पारंपारिक व साचेबंद आहे. महाराष्ट्रातील दोन पाटील परिवारांमधील नेहमीच दिसणाऱ्या स्पर्धेची ही कथा आहे. यातील 'दादा पाटील' ही व्यक्तीरेखा चांगल्याचे प्रतिनिधीत्व करते. तर बाबा पाटील हे वाईटाचे प्रतिनिधीत्व करतात. 'बाबा पाटील' हा खलनायक आपल्या दृष्टपणामुळे आणि अत्याचारीपणामुळे गावकऱ्यांसाठी एक प्रकारे कुरूपच बनला आहे. दादा पाटील बाचा पाटलाच्या वाईटपणाचाही चांगला सामना देतो. परंतु एका तापात दादाचा मृत्यू होतो आणि बाबा आपले अत्याचार पुन्हा सुरू करतो. दादाची पत्नी हरणाबाई हिच्याबद्दल बाबाला लैंगिक आकर्षण वाटत असते. तिच्यावर बलात्कार करण्यासाठी तो एका रात्री दादाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. पण हरणाबाई त्याच्यावर त्याच्यावर पिस्तूल झाडते व तो मारला जातो. गावातले कुरूप संपते.

40. केवड्याचं कणीस :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कादंबरीत गुंड्या नावाचा एक पहिलवान असतो, तो आणि त्याचे साथीदार त्यांच्या मूर्खपणाची सामान्य कथा आहे.

41. डोंगरचा राजा :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, 'माझे माहेर वाघदरा' मध्ये असलेला सावळा मांग हा याही कथेचा नायक आहे. भारतातील ब्रिटिश राज्याला मांगांपासून धोका होतो. त्यांच्या बंडाची शक्यता होती. म्हणून सरकारने मांग जात गुन्हेगार जात म्हणून जाहीर केली. या कायद्याविरुध्द सावळा व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेले बंड या घटनेवर ही कथा आधारलेली आहे.

42. सापळा :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कथेत वास्तव व कल्पित यांचे मिश्रण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांमध्ये अस्मिता जागृती निर्माण केली. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील दलितेतरांमध्ये वर्णाभिमानामुळे संताप उसळला. त्यांनी अस्पृश्यांना सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला पण अखेर अस्पृश्यांनी उच्चवर्णियांवर मात कशी केली याचे चित्रण या कादंबरीतून व्यक्त केल्याचे दिसून येते.

43. सुलतान :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही कथा मार्क्सवादी दृष्टीकोनातून लिहिलेली आहे. 'सुलतान' या माणसाचा केवळ पोट भरण्यासाठीच वीस वर्षे आयुष्यभराचा संघर्ष आणि त्यामधील त्याचा पराभव हा या कथेचा विषय आहे. तो नावाचा जरी सुलतान असला तरी अगदी गरीब व दुर्दैवी माणूस आहे. माणूस शेवटी अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच झगडत असतो. सामान्य माणूस आपले जीवन प्रामाणिकपणे, सहिष्णुतेने आणि नीतिनियमांच्या चौकटीत राहून जगण्याचा प्रयत्न करतो. पण एवढे सारे करूनही त्याला पोटापुरते अन्नही मिळत नाही. तेव्हा अशा भुकेल्या माणसापुढे बंड करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. असे विशद केलेले आहे.

44. मकुल मुलाणी :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, आर्थिक समस्या मकुलला माणसातून उठवतात हे कथेचे सार आहे. आर्थिक स्थैर्य हाच मानवी जीवनातील आनंदाचा पाया असतो. बेकारी आणि उपजीविकेसाठी कमावण्याकरिताची स्पर्धा ही रक्ताच्या नातलगांनाही एकमेकांचे शत्रू बनवतात हे या कथेचे सूत्र आहे.

45. कोंबडी चोर :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही कथा एखाद्याची गरिबीच त्याला चोरी करायला भाग पाडते आणि गरिबी नष्ट केल्याशिवाय चोरी किंवा तत्सम गुन्हे थांबणार नाहीत असे दाखवते. स्वतंत्र भारताचे सरकार जनतेचे दारिद्र्य व भूक कमी करील अशी अपेक्षा होती, पण ती अजून पूर्ण झालेली नाही असाही विचार यात मांडला आहे.

46 चोरांची संगत :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कथेत 'भाऊ माळवदीकर' नावाच्या धाडसी माणसाचे चित्र रेखाटले आहे. भाऊ माळवदीकर हा अण्णाभाऊंचा नातलग आहे. केवळ पोट भरण्यासाठी त्याला चोरीचा मार्ग स्वीकारावा लागला होता. या कथेकडे वाचकांनी मार्क्सवादी दृष्टीकोनातून पाहावे अशी अण्णभाऊंची अपेक्षा असावी. असे विशद केलेले आहे.

अण्णा भाऊ साठे यांच्या गीतांचा Lyrics साठी येथे क्लिक करा 

47. जिवंत काडतूस :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, 1942 सालचा भारताचा स्वातंत्र्यलढा कसा उत्कर्षबिंदूवर पोचला होता हे सांगणारी ही कथा आहे. अण्णाभाऊंचा मित्र 'नरसू' हा या लढ्यात स्वातंत्र्यसैनिक बनला होता. त्यालाच रुपकात्मक अर्थाने अण्णा भाऊंनी 'जिवंत काडतूस' म्हटले आहे. ही कथा सामाजिक म्हणण्याऐवजी राजकीय म्हणावी लागेल. असे मला वाटते.

48 बळी:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, एक संस्थानिक शिकारीला जातो. हाकाऱ्यांनी त्याच्यासमोर आणलेल्या रानडुकरांना मारायला जाताना, अनेकदा त्याचा नेम चुकतो. मग रानडुकरांना मारण्यासाठी जेव्हा तो रायफल उचलतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याच्यात काडतुसेच नाहीत. संपूर्ण दिवस घालवून सुध्दा त्याला एकही शिकार मिळत नाही. शेवटी दुसऱ्या कुणीतरी मारलेली रानडुकरे तो आपण केलेली शिकार म्हणून मिरवण्यासाठी आपल्या वाड्यात नेतो. समाजातील शिकारी मनोवृत्ती व्यक्त झाल्याचे दिसून येते.

49. खोड :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही बबन्या नावाच्या खोडसाळ मुलाची कथा आहे. 'बबन्या' हा 'रामू' व 'लक्ष्मी ढमाले' यांचा मुलगा असतो. त्याचा खोडसाळपणा हा खलनायकाच्या पातळीवर जाणारा आहे. कारण तो आपल्या खलप्रवृत्तीच्या बापाचे अंधानुकरण करत असतो. अंधानुकरणाचे घातक परिणाम हे या कथेतून व्यक्त केलेले आहेत.

50. दुर्दैवी :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, 'सयाजीराव भोसले' हा एक सालस आणि प्रमाणिक माणूस असतो. 'बाळा चौगुले' आणि त्याची पत्नी हे दुष्ट प्रवृत्तीचे असतात. ते दोघे सयाजीराव भोसलेच्या मुलांना आणि सुनांना सयाजीराव विरुध्द फितवतात. चौगुले पती-पत्नी सयाजीराव भोसलेचे सुखी आयुष्य कशा पध्दतीने विस्कटून टाकतात याचे चित्रण या कादंबरीतून केले आहेत.

51. वेडा वारा :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, मराठी साहित्यातील बहुतेक कथांमधील विवाहित तरुणी सासरहून माहेरी पळून जातात. परंतु वेडा वारा मधील विवाहित तरुणी याच्या अगदी उलट वागते. पतीच्या प्रेमासाठी व्याकूळ झालेली गंगू माहेरहून सासरी पळून जाते. या वेगळेपणामुळे ही कथा उठून दिसणारी कथा यातून व्यक्त होते.

52. दाभाड्यांचा वाद :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, दाभाडे कुटुंबातील थोरला भाऊ जिजाबा आणि धाकटा भाऊ हणमा हे दोघे अगदी लहानसहान गोष्टींवरून वाद घालत असतात. आईची काळजी घेणे, जिजाबाच्या बकरीने हणमाच्या भाकरी खाऊन टाकणे, हणमाच्या बकरीने जिजाबाच्या भाकरी पळवणे, घरांवर कौल घालणे अशा लहानसहान गोष्टी त्यांच्या वादाचे विषय असतात. पण जेव्हा हणमाला पोलीस अटक करणार आहेत असे जिजाबाला समजते तेव्हा हो हणमाच्या सगळ्या चुका माफ करून त्याच्या बाजूने उभा राहतो आणि त्याला वाचवतो. असे विशद केलेले आहे.

53. वारणेचा वाघ :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही कादंबरी सांगली जिल्ह्यातील 'कुमज' नावाच्या खेड्यातल्या 'सत्तू भोसले' यांची कथा आहे. या कादंबरीत अण्णाभाऊंनी जनतेची पिळवणूक करणारे देशी सावकार-जमीनदार आणि परकीय ब्रिटिश राज्यकर्ते यांच्या विरुध्द लढणाऱ्या नायकाचे चित्रण केले आहे. ब्रिटिशांचा अरेरावीपणा, दडपशाही आणि इतरांवर गुलामगिरी लादण्याची वृत्ती यांच्याविरूध्द बंड करणाऱ्या सत्तू भोसले या वाघासारख्या माणसाची ही शोकान्त या कादंबरीतून चित्रीत केले आहेत.

या कादंबरीतून अण्णाभाऊंनी साहस, स्वाभिमान, स्वातंत्र्य मिळविण्याची अदम्य इच्छा, आत्मविश्वास, दृढता आणि प्रामाणिकपणा या भारतीय आणि वैश्विक मूल्यांची जाणीव व्यक्त केले आहेत. या कादंबरीवर 'वारणेचा वाघ' या नावाचा चित्रपट 1970 मध्ये निर्माण इ गाला आहे.

54. फुलपाखरू :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही सुधारगृहातील मुलांची आणि त्यांच्या गुन्हेगारी जीवनाची कथा आहे. दिलीप आणि 'ग्यान' ही सुधारगृहातील दोन मुले रोहिणी या मुलीला सोनेरी भविष्याचे, नोकरीचे आणि पैशाचे अमिष दाखवून फसवून तिला तिच्या गावातून मुंबईला आणतात. प्रत्यक्ष मुंबईला आल्यावर मात्र तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. ही 'रोहिणी' म्हणजेच कादंबरीच्या शीर्षकातील 'फुलपाखरू' होय. दिलीप नावाचा एक जॅक नावाचा दलाल या गि-हाइकाजवळ तिचे वर्णन फुलपाखरू असे करतो. रोहिणीला या किळसवाण्या जीवनाचा कंटाळा आलेला असतो. तिला त्यातून मुक्त व्हायचे असते. सुदैवाने तिच्या झोपडपट्टीत तिच्या झोपडीसमोरील इ गोपडीत राहणारा राजा हा तरुण, ती वेश्या असल्याचे ठाऊक असूनही तिच्याशी लग्न करण्याची तयार दाखवतो आणि दिली व ग्यान या समाजकंटकांनी तिला ज्या वेश्याव्यवसायाच्या नरकात ढकललेले असते त्यातून राजा तिची सुटका करतो. असे विशद केलेले आहे.

55 रणगंगा:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कादंबरीचे शीर्षक कान्हेरी व करूंगाळी या दोन गावांमधून वाहणाऱ्या 'रानगंगा' या नदीवरून देण्यात आले आहे. या कादंबरीची नायिका आणि नायक हे एकमेकांशी वेर असलेल्या दोन व्यक्तींची मुले असतात. पण त्यांच्या प्रेमामुळे या दोन कुटुंबातील वैराचा शेवट व सभेट होतो अशी या कादंबरीची कथा आहे. असे विशद केलेले आहे.

56 आग:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, 'अनंत चव्हाण' हा भावनाशील व प्रसिध्द लेखक एका तरूणीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे तो कसा उदध्वस्त होतो याची कथा म्हणजे 'आग' ही कादंबरी होय. ही एक अपुऱ्या प्रेमाची कहाणी आहे. असे विशद केलेले आहे.

57. मूर्ती :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कादंबरीत अण्णाभाऊंनी तरूणांनी जातिभेदाच्या भिती नष्ट कराव्यात आणि आंतरजातीय विवाह करावेत या मताचे समर्थन केले आहे. 'वसंत' हा या कादंबरीचा नायक आहे. तो एक अनाथ, संवेदनशील आणि चित्रकलेत कुशल असा शाळकरी विद्यार्थी असतो. तो उच्च जातीतील मूर्ती नावच्या वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडतो. हे दोघे वेगवेगळ्या जातीचे असूनही विवाह करतात, असे या कादंबरीचे कथानक आहे. सामाजिक वास्तव व्यक्त केलेले आहेत.

58. फुलपाखरू :

यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कादंबरीचे वर्गीकरण 'महिलांच्या समस्यांवरील कादंबऱ्या' यात केले आहे. पण तीही प्रेमकथाच आहे.

59. फरारी :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, शूर आणि संवेदनशील असा शिवा मांग' हा या कथेचा नायक आहे. तो कामचुकार चांभाराला मारहाण करतो आणि फरारी होतो. पण पोलीस त्याला पकडतात. अटक करतात. त्याला बारा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होते. शिक्षा भोगून आल्यावर आपल्या विस्कळीत झालेल्या कुटुंबाची घडी तो पुन्हा नीट बसवतो. असे विशद केलेले आहे.

60. स्मशानातील सोनं :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही अण्णाभाऊंची एक अजरामर कथा आहे. भारतातील गरीब, अशिक्षित आणि बेकारीचे वास्तव या कथेत चित्रित झाले आहे. गरिबी आणि बेकारी माणसाला दहन आणि दफन केलेल्या प्रेतांचे अवशेष उकरून, प्रेतांची राख चाळून प्रेतावरील सोन्याचे काही कण शोधायला कसे भाग पाडते आणि त्यात काम करणाऱ्या आपल्या हाताची बोटेही नायकाला गमवावी लागतात याचे चित्रण आले आहे. 'भीमा' हा या कथेचा नायक आहे. तो एका दगडाच्या खाणीत कामावर असतो. ती खाण अचानक बंद पडते. 'भीमा' विमनस्क

होतो. तो नदीकाठी जातो. तिथे त्याला नुकत्याच दहन केलेल्या प्रेताच्या राखेतील सोन्याची अंगठी दिसते आणि त्याचा उपजिविकेचा मार्ग सापडतो. प्रेतांचे अवशेष उकरून, त्यांची राख चाळून मिळालेले सोने विकून तो आपला आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरू लागतो. एक रात्री भीमा एका स्मशानातील दफन केलेले प्रेत शोधत असताना कोल्ळ्यांचा एक कळप त्याच्यावर हल्ला करतो. कारणे ते कोल्हेही दफन केलेले प्रेत खाण्यासाठी आलेले असतात. भीमा आणि कोल्ह्यांचा कळप यांच्यामध्ये ते प्रेत मिळवण्यासाठी लढाई सुरू होते. कोल्हे भिमाच्या अंगाचे लचके तोडतात. प्रचंड झटापटीनंतर भीमा कोल्ह्यांना दूर हाकलून देण्यात यशस्वी होतो.

तो प्रेताच्या तोंडातील सोने काढून घेण्यासाठी प्रेताच्या तोंडात हात घालतो तेव्हा त्याचा हात प्रेताच्या तोंडात अडकतो आणि कोल्हे पुन्हा भीमावर हल्ला करतात. तो एका हाताने कोल्ह्यांशी झुंज देतो आणि दुसऱ्या हाताची बोटे प्रेताच्या तोंडातून सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण त्या प्रयत्नात आपल्या हाताची दोन बोटे गमावतो. म्हणजे त्याचा हात कोणतेही काम करण्यास आता निकामी झालेला असतो आणि दुसऱ्याच दिवशी त्याला कळते की बंद झालेली खाण पुन्हा सुरु झाली आहे. या जगात सत्य हे कधी कधी कल्पितापेक्षा विचित्र असते. या अण्णाभाऊंच्या विधानाचा प्रत्यय या कथेतून दिसून येतो.

61. गजाआड :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, महाराष्ट्राच्या सेंट्रल जेलमध्ये अण्णाभाऊंना काही कैदी भेटले. त्यांच्यावरील कथा या संग्रहात एकत्रित केल्या आहेत. गरिबी व असहायतेमुळे हे लोक गुन्हेगार बनलेले असतात असा सूर या सर्व कथांमधून आटलेला आहे. असे विशद केलेले आहे.

62. भेकड :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, भेकड माणसे माणसाचं जीवन जगण्यासाठी अपात्र असतात. धाडस माणसाचे जीवन सार्थक बनवते तर भेकडपणा जीवनाला निराशाजनक बनवतो. हे या कथेचे वास्तव आहे.

63 सुधारणा:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कथोत श्रीमंतांची गुंडगिरी, गरिबांची पिळवणूक आणि पोलिसांचा भ्रष्टाचार याचे वास्तववादी चित्रण आले आहे. पोलीस भ्रष्टाचारात गुंतलेले असल्याने ते गुन्ह्यांचा तपास करत नाहीत. 'फुला' ही गरीब, श्रध्दाशील आणि प्रामाणिक अशा विठोबा डंगारणे याची मुलगी असते. आपल्याला आणि आपल्या नातेवाईकांना त्रास देऊन जगणे मुश्किल करणाऱ्या गुंगाजी उर्फ गुंग्या पाटील या गावगुंडांचा ती मोठ्या धाडसाने बदल घेते.

64. चिरागनगरची भुतं :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, हा कथासंग्रह आहे या कथासंग्रहात वेताळ, मानकी, चंगीजखान, रम्मी, काळे मास्तर, अडीच आंधळे, येसू, गेंडा, परम्, भूतांचा शिमगा इत्यादी कथा आहे.

या सर्व कथांचे सूत्र एकच आहे. काही माणसांचे जगणे जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती माणसं नसून भुतं आहेत असं आपल्याला वाटू लागते. ही माणसं मुंबईमधल्या आग्रा रोड, चिरागनगर, आझादनगर अश भागांमधील नरकतुल्य झोपडपट्यांमध्ये राहणारी माणसं आहेत. असहायता, अंधश्रध्दा, गरिबी, पिळवणूक, मद्यपान व वेश्यागमनासारखी व्यसने, उपेक्षा, व्यभिचार, चोऱ्यामाऱ्या या गोष्टींनी ती वेढलेली आहेत. त्यांचे जिणे पाहून अगदी भुतांनादेखील स्वतःची शरम वाटेल, असे स्वतः अण्णाभाऊ म्हणतात. "सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अन्यायामुळे ही भुतं वेडी झालेली आहेत. ती आनंद आणि दुःख या संकल्पनांचा अर्थ बदलून जगत आहेत. तुरुंगवास. फसवणूक, खून, दरोडे हे त्यांच्या आयुष्याचे अभिन्न भाग बनले आहेत, 'चिरागनगरी भुतं' या सग्रहातील सर्वच कथांमधून याचा प्रत्यय येतो. असे विशद केलेले आहेत."

65. दारुबंदी :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही कथा दुसऱ्या कथासंग्रहात 'काळू' या शीर्षकानेही प्रसिध्द आहे. काळू, काळूची प्रेयसी फातमा आणि काळूचा प्रतिस्पर्धी अकबर या तीन अट्टल गुन्हेगारांच्या गुन्हेगारीचे चित्रण यात आले आहे.

66. निळू मांग :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, मुळात सुसंस्कृत असलेल्या निळू मांगाला चिमाजी पाटील आणि राजू सुताऱ्यासारख्यांचा अप्रामाणिकपणा आणि हरामखोरपणा गुन्हेगार बनवतात. निळू मांगाने यानंतर केलेले गुन्हे हे स्वतःच्या फायद्यासाठी केलेले नसतात. तर बेइमान माणसांना धडा शिकवण्यासाठी केलेले असतात. त्यामुळे त्याचे गुन्हे माफ केल्यानंतर तो कसा पुन्हा सभ्यपणे जगू लागतो, याचे चित्रण या कथेत आले आहे.

67. उपकाराची फेड:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कथेत चांभार स्वतःला मांगापेक्षा श्रेष्ठ समजतो व मांगाला अस्पृश्य मानतो. भारतीय समाजरचनेत अस्पृश्यतादेखील उच्चवर्णीय, मध्यवर्णीय व निम्नवर्गीय अशा स्तरांमध्ये झिरपत जाणारा एक रोग आहे असे चित्रण यात आले आहे. यातुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा प्रभावही झाला आहे.

68. शेरखान :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आपले स्वतंत्र विचारच सर्वात महत्वाचे असतात. म्हणून माणसाने आपले विचार कधीही दुसऱ्याकडे गहाण ठेवू नयेत. हा शेरखान या कथेचा संदेश आहे. असे विशद केलेले आहे.

69. बरबाद्या कंजारी :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, या कथेत मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या भटक्या, अशिक्षित व गरीब अशा कंजारी समाजातील बरबाद्या नावाच्या व्यक्तीचे चित्रण आले आहे. कंजारी समाजाची अवस्था दयनीय आहे आणि या समाजात अजूनही अमानुष प्रथा प्रचलित आहेत. याचे चित्रण या कथेत आले आहे. प्रचलित प्रथेप्रमाणे बरबाद्या आपली मुलगी मिल्ली हिला दोनशे रूपयाने डल्लाराम याला विकतो. तिचे लग्न डल्लारामचा मुलगा सदू याच्याशी होणार असते. कंजारी रूडीप्रमाणे एखाद्या स्त्रीला पतीनिधनानंतरही आमरण आपल्या सासरीच राहावे लागते. पण आपल्या पतीच्या मृत्यूनंतर मिल्ली हा नियम मोडते आणि समोरच्याच झोपडीत राहणाऱ्या हेदऱ्याबरोबर पळून जाते. जातपंचायत डल्लारामची बाजू घेते. बरबाद्याला वाळीत टाकते. पण बरबाद्या या गोष्टींना काहीच किंमत देत नाही. अन्याय परंपराविरुध्द बंडखोरी करणारा या दृष्टीने अण्णाभाऊंनी बरबाद्याचे चित्र रेखाटले आहेत.

70. अमृत:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, यात जुन्या वैदूंच्या आपली औषधे गुप्त राखण्याच्या वृत्तीची थट्टा केलेली आहे. अमृत हे एक पौराणिपेय आहे. अमृत प्राशन केले तर माणूस अमर होतो असा समज आहे. पण अमृत कथेतील पेय म्हणजे सर्पदशं उत्तरवणाऱ्या 'आराटी' या जंगली वनस्पतीचा रस होय. जिवा नावाच्या निवेदकाच्या मित्राला हे औषध माहीत असते. पण निवेदकाने पिच्छा पुरवूनही ते सांगत नाही. विनोदी संवादाने कथा फुलली आहे.

71. रामरावण युध्द :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, एका गावातील एकमेकांविरुध्द असलेले गट रामलीला सादर करताना रामायणातील राम-रावण युध्दाच्या प्रसंगाचा उपयोग एकमेकांचा बदला घेण्यासाठी कसा करून घेतात, याचे या विनोदी कथेत मजेशीर व विनोदी पध्दतीने चित्रण करण्यात आले आहे.

72. तमाशा :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही बापू आणि त्याच्या दोन प्रेयसी गोजा आणि नवटाक यांच्यामधील आदर्श प्रेमाची कहाणी आहे. एरवी एकाच पुरुषावर प्रेम करीत असलेल्या दोन स्त्रिया एकमेकींचा मत्सर करीत असतात, पण गोजा आणि नवटाक मात्र तसा मत्सर करीत नाहीत. बापूवर आपल्या एकटीचाच हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न गोजा व नवटाक करीत नाहीत.

73. मेंढा :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, आपल्या आक्रमक स्वभावाचे जिवंत प्रतीक म्हणून लखुजी माने एक मजबूत व लढाऊ मेंढा पाळतो. तो चोरीला जातो. माणगावच्या पंढरी पाटलाने तो चोरला असे वाटून लखूजी पंढरीचा मेंढा मारतो. पंढरीची माणसे लखुजीला मारून याचा बदला घेतात.

हेही पाहा: Dr Babasaheb Ambedkar आणि अण्णा भाऊ साठे 

74. तारे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, 'तारा' ही कशा नेहमीच्या प्रेमकथेहून बरीच वेगळी आहे. नेहमीच्या प्रेमकथामध्ये एखाद्या स्त्रीचा खलपुरुषाकडून पाठलाग होत असतो. पण तिचे प्रेम दुसऱ्याच कुणा पुरुषावर असते. शेवटी त्या खलपुरुषांना कोणत्या ना कोणत्या प्रकाराने दूर करून नायक आणि नायिका यांचे मिलन होत असते. पण 'तारा' या कादंबरीने या चाकोरीला छेद दिला आहे. तारा ही अनिल पाटील नावाच्या एका डाकूसाठी हेरगिरी, मदतनीस आणि खबरी म्हणून काम करत असते. अनिल मॅट्रिक पास झाल्यावर उपजीविकेसाठी बंड्या वाघ या खोट्या नावाने दरोडे घालू लागतो आणि यासारखेच अन्य गुन्हे करत असतो. तो 'तारा' ला आपल्या जाळ्यात पकडतो आणि खबर पुरवणा-या व्यक्तीसारखा तिचा वापर करून घेतो. तिने दिलेल्या माहितीचा आधार घेऊन तो दरोडे घालत असतो. अशा प्रकारे दोघे मिळून लोकांची मालमत्ता लुटतात. पण लवकरच त्यांच्या कारवाया उघडकीला येतात. त्यामुळे सी.आय.डी. तारा हिला अटक करण्याचा आदेश पोलिसांना देतात. तिला पकडण्यासाठी नेमलेल्या सी.आय.डी. पोलिसाची व तिची भेट होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. लग्नही करतात आणि अनिल पाटील पोलिसांकडून मारला जातो.

75. प्रायश्चित्त:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कथेत चार व्यक्तींकडून गोत्रगमन होऊन नैतिकतेचा भंग होतो. या पापाचे प्रायश्चित म्हणून ते चौघेही कशा प्रकारे आत्महत्या करतात याचे शोकान्त चित्र या कथेत रेखाटले आहेत.

76. मरीआईचा गाडाः

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, ही अतिशय गाजलेली कथा आहे. या कथेतील नाना हे शास्त्रीय दृष्टीकोनाचे प्रवक्ते आहेत. 'सटवाजी', 'केरू', 'भाऊ बाबाजी', 'म्हादबा' हे जुन्या अशास्त्रीय आणि अंधरध्देवर आधारलेलेल्या दृष्टीकोनाचे प्रतिनिधीत्व करतात. नाना ही व्यक्तिरेखा ब्रिटीशांविरुध्द बंडखोरी करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर आधारलेली आहे असे म्हटले जाते. 'क्रांतिसिंह नाना पाटील' हे महाराष्ट्रातील प्रसिध्द कम्युनिस्ट नेते होते. मरीआई नावाची एक देवी कॉलरा वगैरे रोगाच्या साथी सुरू करते आणि तिला शांत करण्यासाठी तिची पूजा करून तिचा गाडा शेजारच्या गावच्या हद्दीत सोडल्यास त्या साथीचे रोग आपल्या गावातून शेजारच्या गावात जातात. अशी एक अंधश्रध्दा महाराष्ट्रात प्रचलित होती. मरीआई संबंधीच्या समजाचे समर्थन करणाऱ्यांचे मुद्दे कसे निरर्थक आहेत हे लोकांना पटवून देण्यात नाना यशस्वी होतात. अशा प्रकारे जीवनाबद्दलचा प्रामाणिक, वैज्ञानिक आणि नवा दृष्टीकोन जुन्या पध्दत व अंधश्रध्देवर विजय मिळवतो हे या कथेत दाखवले आहे.

सारांश व निष्कर्ष :-

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. ज्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी 37 कादंबऱ्या, अकरा कथासंग्रह, दोन नाटकं, एक प्रवास वर्णन, तेरा लोकनाट्य आणि दोन शहिरी वाड्मय इत्यादी लिहून साहित्य विश्वामध्ये फार मोठी कामगिरी केलेली आहे. यांच्या कथा कादंबऱ्या यावर चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. एका निरक्षर व्यक्तीने निर्माण केलेल्या या साहित्यसंपदेचा डोंगर मराठी साहित्यविश्वातील मोठ्या लोकांना आणि उच्च विद्याविभूषित विद्ववानांना भुवया उंचावायला भाग पडणारा आहे आणि भुरळ घालणारा आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचार त्यांच्या साहित्याची समीक्षा त्यांच्या साहित्याचा आशय विषय इत्यादी संशोधनाचे प्रमुख विषय ठरलेले आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर बाबूराव गुरव आणि माधव गादे यांनी विद्यावाचस्पती या पदवी करिता संशोधन प्रबंध सादर केले आहेत. त्यानंतर अनेक संशोधकांच्या संशोधन विषयाचा केंद्रबिंदू म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याकडे पाहिले जाऊ लागले.

संदर्भ यादी:-

1. प्रा. त्रिभुवन शैलेश, "साहित्य सम्म्राट अण्णाभाऊ साठे (चरित्र वाड्मय आणि प्रातिनिधिक लेखन)" पायल पब्लिकेशन, पुणे-2006 पृ.क्र.13

3. कठाळे नानासाहेब, पूर्वोक्त, पृ.क्र. 30

3. रोकडे मनोहर, "साहित्यातील तेजस्वी ताराः अण्णाभाऊ साठे" साधना सेवा प्रकाशन, पूणे, 2015 पृ.क्र. 28

4.कठाळे नानासाहेब, पुर्वोक्त, पृ.क्र. 28

5. संपा. शिंदे रणधीर, "अण्णाभाऊ साठे साहित्य समिक्षा, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर-2011 पृ.क्र. 78 (अण्णाभाऊ साठे यांचे शाहिरी व्यक्तिमत्व शाहिर आत्माराम पाटील)

6. अण्णाभाऊ साठे, "फकिरा", सुरेश एजन्सी, मुंबई, 1988 पृ.क्र. 88

Source: अण्णा भाऊ साठे यांचे कथा कादंबऱ्या आणि साहित्य - प्रा. श्रीरंग श्यामराव लोखंडे ( यशवंतराव चव्हाण महा विद्यालय, तुळजापूर, धाराशिव (उस्मानाबाद)

या लेखा मध्ये काही चुक झाली असेल तर खाली दिलेल्या E-mail वर आम्हाला कळवा.

जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम 

आम्हाला Instagram वर फॉलो करा!

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.

Post a Comment

3Comments

  1. Thanks for the information Jay Anna

    ReplyDelete
  2. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 💛💛

    ReplyDelete
Post a Comment