डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय? | निळा रंग का वापरतात आंबेडकरी जनता
'रणशिंग फुंकले तू जाळण्या गुलामी, या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी…' प्रल्हाद शिंदेंनी म्हटलेलं हे गाणं असो किंवा शंभू मीणा या राजस्थानी गायकाचं 'रंग जाओ निला रंग में, रंग जाओ बाबासाहब के रंग में…' डॉ. आंबेडकरांना अभिवादन हे रंगाच्याच माध्यमातून दिलेलं आपल्याला या गाण्यातून दिसतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसाठी निळा रंग हा आंबेडकरी चळवळीसाठी समानार्थी शब्दच वाटतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी तर त्यांच्या ध्वजात सुद्धा निळा रंग घेतलाच आहे. पण राजकीय पक्षाशी निगडित नसलेले डॉ. आंबेडकरांचे अनुनायी देखील निळा रंग हा डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचे प्रतीकच मानतात.
चळवळीमध्ये निळा रंग कुठून आला?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षाचा निळा रंग होता. समता सैनिक दलाची स्थापना 1927 मध्ये झाली होती.
समता सैनिक दलाच्या टोप्या देखील निळ्याच होत्या. आजही समता सैनिक दलाच्या टोप्या आपण पाहिल्या तर त्या निळ्याच आहेत.
डॉ. आंबेडकरांनी दिलेला रंग, त्यांची परंपरा जागृत ठेवणारा रंग असं या रंगाचं वर्णन करता येईल. पण याचे आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात संदर्भ कुठे सापडतात हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. त्याचं उत्तर आपण शोधू.
'ध्वजाचा अर्थ आहे आपल्या उद्दिष्टांसाठी संघर्ष'
1936 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजेच स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. मुंबई काउन्सिलच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकर उभे राहिले होते तेव्हा त्यांचे चिन्ह 'माणूस' हे होते. पुढे त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशनची (शेकाफे) स्थापना केली.
शेड्युल कास्ट फेडरेशनचे निवडणूक चिन्ह हत्ती असे होते, तर शेकाफेच्या ध्वज निळा होता.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे Original Photos साठी येथे क्लिक करा
ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशनची जी घटना (Constitution) आहे त्या घटना पुस्तिकेतील 11 व्या भागात ध्वज कसा असेल याचा उल्लेख करण्यात आला आहे. फेडरेशनच्या ध्वज म्हणजे 'त्रिकोणी आकाराच्या निळ्या कपड्यावर तारे असतील.'
30 जानेवारी 1944 रोजी कानपूर येथे समता सैनिक दलाची परिषद झाली होती. डॉ. आंबेडकर देखील या परिषदेला उपस्थित होते. त्यांच्यासमोर काही ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले होते त्यापैकी एक ठराव समता सैनिक दलाच्या घटनेबाबत होता.
या घटनेचा मसुदा आंबेडकरांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यांची मान्यता मिळाल्यावर समता सैनिक दलाची घटना लागू करण्यात आली होती.
या घटनेमध्ये समता सैनिक दलाचा ध्वज कसा असेल याचा उल्लेख करण्यात आला आहे.
'समता सैनिक दलाच्या ध्वजाची लांबी चार फूट आणि रुंदी अडीच फूट असेल. पूर्ण ध्वज गडद निळ्या रंगाचा असेल, ध्वजाच्या वरील डाव्या बाजूला 11 तारे पांढऱ्या रंगात असतील.'
'ध्वजाच्या मधोमध पांढऱ्या रंगात सूर्य असेल. त्याच्या खाली SCF ही अक्षरे असतील. खालील उजव्या बाजूला SSD ही अक्षरे असतील.'
'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे.
'निळ्या ध्वजाखाली सर्व लोक येत आहेत'
डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.
मराठी भीम गीतांचे Lyrics साठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर सर्वच जण डॉ. आंबेडकरांसोबत आहेत हे सांगण्यासाठी त्या काळचे नेते निळ्या रंगाचे प्रतीक त्यांच्या भाषणातूनही वापरत असत.
याचे एक उदाहरण केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या समग्र डॉ. आंबेडकर वाङ्मयातील 17 व्या खंडाच्या तिसऱ्या भागात आहे.
नोव्हेंबर 1951 मध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईला आले होते तेव्हा त्यांचे स्वागत हजारो स्वयंसेवकांनी केले होते. त्यावेळी ते हातात शेकाफेचे निळे झेंडे घेऊन आले होते.
आर. जी. खरात यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील भोईवाडा येथे डॉ. आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला होता. हा सत्कार शेकाफेच्या मुंबई शाखेच्या वतीने करण्यात आला होता.
यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात खरात म्हणाले होते, "डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वातील निळा ध्वज घेऊन शक्तिशाली संघटन उभे करण्यात आले आहे. इतरही लोक या निळ्या ध्वजाखाली एकत्र येत आहेत."
त्यावेळच्या वृत्तपत्रातही या ध्वजाची आणि टोप्यांच्या रंगांचा उल्लेख करण्यात आला आहे.
"25 नोव्हेंबर 1951 रोजी डॉ. आंबेडकरांनी शिवाजी पार्कावर एक सभा घेतली होती. या सभेला अंदाजे 2 लाख लोक उपस्थित होते.
"तारे असलेला निळा झेंडा' घेऊन समर्थक उपस्थित होते तर 'निळी टोपी' घातलेले स्वयंसेवक गर्दीचे आणि वाहतुकीचे नियंत्रण करत होते अशी नोंद 26 नोव्हेंबर 1951 च्या 'द नॅशनल स्टँडर्ड'मध्ये आली होती.
सत्यमेव जयतेचे प्रतीक
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ध्वजामध्ये अशोकचक्र आहे.
याचे महत्त्व सांगताना, आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे प्रवक्ते अविनाश महातेकर सांगतात, "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निळ्या ध्वजावर अशोक चक्र आहे. हे गतिमानतेचे प्रतीक आहे. सत्यमेव जयतेचे प्रतीक आहे. महासागराचे निळेशार पाणी, त्याची अथांगता, सर्वव्यापी आभाळही निळेच आहे. तेव्हा आभाळासारखी निळाई समाजात रुजावी हा त्यामागचा उद्देश आहे."
"हा निळा रंग डॉ. आंबेडकरांनी अत्यंत विचारपूर्वक दिलेला आहे. राज्यघटनेतही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये डॉ. आंबेडकरांनी सांगितली आहेत. त्याचेच प्रतीक हा निळा रंग आहे. सागर हे सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे.
Dr Ambedkar लिखित पुस्तक आणि BAWS Download करण्यासाठीं येथे क्लिक करा
"जगातील सर्व नद्या महासागराला येऊन मिळतात आणि सागर निळा होऊन जातो. त्याप्रमाणे सर्व प्रवाह राष्ट्रात विलीन व्हावे, वर्ग, वर्ण, जाती, लिंग मुक्त एकसंध भारतीय समाज निर्माण व्हावा, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं," असं महातेकर सांगतात.
'निळ्या रंगाने लोकांना संरक्षण कवच प्रदान केले'
निळ्या रंगाचे महत्त्व सांगताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सांगतात की निळा रंग हा व्यापकतेचं प्रतीक आहे. निळा झेंडा हा बाबासाहेबांचेच प्रतीक आहे. आणि लोकांचे त्याच्याशी भावनिक नाते जोडले गेले आहे.
त्याचे एक उदाहरण ते देतात, "महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडला आणि गावागावातले लोक मुंबईत येऊन राहत असत. जागा मिळेल त्या ठिकाणी झोपड्या बांधू लागले. त्या झोपड्यांबाहेर ते निळा झेंडा लावत असत. त्यामुळे त्यांच्या मनात एक सुरक्षितता निर्माण झाली."
'राजकारणात प्रतीकांना महत्त्व आहे'
राजकारणात प्रतीकांना महत्त्व आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते जाणून होते, म्हणूनच त्यांनी विचारपूर्वक झेंडा तयार केला, असं अभ्यासक सांगतात.
"प्रतीकांबरोबरच आंबेडकरांनी व्यवहाराच्या दृष्टिकोनातूनही या रंगाची निवड केली असू शकते," असं मत ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार उत्तम कांबळे यांनी मांडले.
ते सांगतात, "शेकाफे स्थापन होण्याआधी हिंदुत्ववाद्यांकडे भगवा होता, कम्युनिस्टांकडे लाल होता, मुस्लिम लीगकडे हिरवा, मग सात रंगांपैकी कोणता निळा हा पर्याय त्यांच्यासमोर होता. निळा रंग ठळक उठून दिसतो आणि तो रंग जर पार्श्वभूमीवर असेल तर इतर रंगही उठून दिसतात हा एक विचार त्यामागे असू शकतो.
वेगवेगळ्या विषयांवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे असणारे विचार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
"आणि जर त्या प्रतीकांबाबत सांगायचं म्हटलं तर निळ्या रंगाबद्दल असं म्हटलं जातं की इट्स ए नेचर नॉट अ कलर. म्हणजेच निळ्या रंगाशिवाय निसर्गाला पूर्णत्वच येऊ शकत नाही. समुद्र आणि आकाश या दोन्ही गोष्टी निळ्या आहेत. त्या सर्वत्र आहेत. आकाश सोडून काहीच नाही तसंच सागर सोडूनही काहीच नाही. हा विचार त्यामागे आहे.
"पुढे जेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या काळात रिपब्लिकन पक्षाची आणि काँग्रेसची युती झाली तेव्हा असं म्हटलं गेलं की पांढरी टोपी आणि निळी टोपी एकत्र झाली. या रंगावर लोकांनी इतकं प्रेम केलं आहे की आता आंबेडकरी चळवळ म्हटलं तर या रंगाशिवाय ती पूर्ण होत नाही हे खरं आहे," असं कांबळे सांगतात.
(संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अॅंड स्पीचेस खंड 17, सामाजिक न्याय विभाग; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन; रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल - संपादक डॉ. शरणकुमार लिंबाळे, दिलीपराज प्रकाशन)
Source: BBC Marathi / Wikipedia
या लेखा मध्ये काही चुक झाली असेल तर खाली दिलेल्या E-mail वर आम्हाला कळवा.
जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम
आम्हाला Instagram वर फॉलो करा!
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.