महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपट आणि चित्रपटाचे प्रसारण | 6 डिसेंबर | महापरिनिर्वाण दिन

Jay Bhim Talk
0
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपट |महाराष्ट्र राज्य तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपट 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ शुक्रवार, दि. 06 डिसेंबर 2024 रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपट आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.
‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी 11 वा. आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी 1 वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे. माहितीपट व चित्रपटाच्या प्रसारणाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.
एक्सhttps://x.com/MahaDGIPR
फेसबुकhttps://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूबhttps://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपटाचे सकाळी ११ वा. प्रसारण

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी 11 वाजता. महासंचालनालयाच्या एक्स, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या 17 मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै 1968 मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.
या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याची ऐतिहासिक घटना दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंतिम दर्शनाचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. जी.जी. पाटील यांनी संकलन केले आहे. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर संगीत दत्ता डावजेकर यांचे आहे. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

‘बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपटाचे दुपारी 01 वा. प्रसारण

भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ ची निर्मिती असलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी 01 वाजता महासंचालनालयाच्या एक्स, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या वतीने एन.एस. थापा यांनी 1981 मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे दुपारी ४ वा. प्रसारण

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी 04 वाजता महासंचालनालयाच्या एक्स, या समाजमाध्यमावरुन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहायला हवा.
या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, फोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)