डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात | Dr Ambedkar On Shivjayanti | Dr Ambedkar and Shivaji Maharaj
महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण देशातल्या ज्या काही महत्वाच्या सुधारणावादी चळवळी झाल्या,त्या महाराष्ट्रातून सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केलं आहे. महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दिलेली आहे.याच महाराष्ट्राच्या सुपुत्राने देशाची राज्यघटना लिहिली ज्यावर आजही हा देश अखंडित आणि घट्ट पाय रोवून उभा आहे,घटना हलली देश हलला. हे सूत्र लक्षात ठेवा.त्या सुपुत्राचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच महाराष्ट्रात एक राजाही होऊन गेला. ज्याला रयतेचं दुःख समजलं. म्हणून त्याला रयतेचा राजा संबोधलं गेलं.
हेही पाहा: छत्रपती शिवाजी महाराज यांचा बद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
राजे अनेक होऊन गेले,त्यांनी सत्ता भोगली.त्यांच्या वंशजांनी सत्ता उपभोगली.परंतु जनतेच्या मनात ते स्थान मिळवू शकले नाहीत. महाराष्ट्रात जन्मलेला हा राजा मात्र जनतेच्या मनात स्थान मिळवू शकला. त्या राजांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. या रयतेच्या राजाच्या शिवजयंती उत्सवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षपदी होते,त्यांनी भाषण केले,आणि काही वेळ मिरवणुकीत सहभाग देखील घेतला.
शिवजयंती उत्सवात अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर
बदलापूर,जिल्हा ठाणे येथील त्रिशत सांवत्सरिक श्री. शिवाजी उत्सव ता. 03 मे 1927 रोजी आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी 06:00 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर – बार-ऍट-लॉ यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव यशस्वी रीतीने पार पडला. सदर उत्सवाच्या व्यवस्थापक कमिटीत अध्यक्ष कोणाला करावे या संबंधाने पुष्कळ वाटाघाटी चालल्या होत्या,शेवटी सर्व गावकऱ्यांच्या सम्मतीने असे ठरविण्यात आले की या उत्सवाला अध्यक्ष मुंबईचे बहिष्कृत वर्गाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसच आणावे.
हेही पाहा: छ. शिवाजी महाराजांचा सुप्रसिद्ध पोवाडा महात्मा फुले यांनी लिहिलेला
या त्यांच्या ठरावाप्रमाणे उत्सव कमिटीचे मुख्य व्यवस्थापक पालये शास्त्री यांनी मुंबईस जाऊन ब्राह्मण-ब्राह्मणेतर पत्राचे संपादक रा.नाईक यांच्यामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली व त्यांना शिवाजी उत्सवाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. पालये शास्त्र्या सारख्या भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मणाने विनंती केल्यावरून डॉक्टर आंबेडकरांनीही त्यांची विनंती मोठ्या आनंदाने मान्य केली. उत्सवाच्या ठिकाणी ठीक 04 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रा. नाईक , रा. सीताराम नामदेव शिवतरकर ,रा. गणपत महादू जाधव या मंडळींसह उपस्थित झाले.
राज्याचा अभिमान नसेल तर राज्य टिकत नाही
उत्सवाच्या ठिकाणी यजमान मंडळींची भाषणे, प्रास्ताविक झाल्यावर उत्सवाचे अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना भाषण करण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेबांनी शिवाजीराजांच्या अंगभूत निरनिराळ्या गुणांवर अत्यंत परिणामकारक असे तब्ब्ल तासभर भाषण केले. ज्या शिवाजीने आपल्या लोकोत्तर गुणांनी राज्य मिळविले ते त्यांचे राज्य चिरकाल का टिकले नाही,आणि शेवटी त्यांनी प्रश्न उपस्थित केला,“एवढे चांगले राज्य लयास का गेले?” आणि उत्तर दिले “कारण त्या राज्याचा सर्वांनाच सारखा अभिमान नव्हता”. म्हणजेच काही लोकांना ते राज्य नको होते. हे भाषण झाल्यानंतर रा. नाईक यांचे विचारपरिपूर्ण भाषण झाले.
![]() |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अप्रतिम मूर्ती / पुतळे |
नंतर रा.भा.ओक यांनी आपल्या विनोदी शैलीत भाषण करत उपस्थितांचे आभार मानले. उत्सवाचे पहिले सत्र संपले. त्यानंतर श्री.पालये शास्त्री यांनी कोणताही किंतु परंतु न बाळगता आपल्या घरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर मंडळीसह भोजन केले.
नंतर रात्री 09 ते 11:30 पर्यंत कीर्तन झाले.या कीर्तनास कोकसल्याही प्रकारचा जातीभेद न पाळता लोक कीर्तन श्रवणास बसली होती,त्यानंतर रात्री शिवाजी महाराजांची पालखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढारीपणाखाली अदमासे 15 हजार लोकांसह नगर प्रदक्षिणा करून हा उत्सव समाप्त झाला.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18, भाग 1, पान क्रमांक 51 [ डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणं संपूर्ण खंड वाचण्यासाठी येथे क्लिक करा ]
©पुनः प्रकाशित :- जागल्या भारत