धर्मांतर करण्यामागचे मुख्य कारणे | बौध्द धर्म च का? धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष | Dhammchakra Din

Jay Bhim Talk
0

डॉ आंबेडकर यांनी बौध्द धर्म का स्वीकारला या मागचे कारण काय? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर का केले?
14 ऑक्टोबर 1956 ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यामागे काय कारणं होती?

हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.

14 ऑक्टोबर 1956 या दिवशी दीक्षाभूमीवर नेमकं काय झालं होतं, त्या दिवशीचा घटनाक्रम, इतिहास आणि परिणाम आणि मुळात बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला या गोष्टी या लेखातून समजून घेऊ या...

बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचीच दीक्षा का घेतली?

बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा पट खूप मोठा आहे. ते वकील होते, विद्वान होते, सामाजिक चळवळीत अग्रेसर होते. मात्र त्यांच्या कार्याचा लसावी काढायचा झाल्यास दलित समाजाच्या व्यक्तींना मनुष्याचा दर्जा मिळवून देणं, त्यांचा आत्मसन्मान वाढवणं आणि आत्मोद्धार करण्यास समर्थ करणं ही त्यांच्या आयुष्याचे मुख्य कार्य होते.

हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन करणे, हिंदू धर्माची मानहानी आणि अवनती रोखणे आंबेडकरांना अपेक्षित होते. 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती. Anhilation of caste या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेवर त्यांनी आसूड ओढले होते. शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार 14 ऑक्टोबर 1956 रोजी केला.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

मात्र हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत असताना आयुष्याच्या अगदी शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या रुपा कुलकर्णी बोधी म्हणतात, "त्यांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस.एम जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.

अनेक वर्तमानपत्रं केली. त्यातून सवर्ण समाजाचं प्रबोधन केलं. ती वापरत असताना सद्हेतुने कान उघडणी केली. 1942 पासून तर ते राजकारणातही होते. घटनाही लिहिली. घटनेत सगळ्यांना अधिकार दिले होते. तरीही त्यांचं समाधान झालं नाही. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची पाहिली निवडणूक हारले होते... | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली निवडणूक | Jaybhimtalk

मे 1956 मध्ये बीबीसीने आंबेडकरांचे एक भाषण प्रसिद्ध केलं. भाषणाचा विषय होता मला बौद्ध धर्म का आवडतो? या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, "मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्त्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात.बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो.तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे."

असा केला बौद्ध धर्माचा स्वीकार

1955 सालानंतर त्यांची तब्येत ढासळत चालली होती. कोणत्याच उपचारांचा त्यांना फायदा होईना. त्याच काळात बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचे कामही सुरू होते. आपण हयात असतांनाच हे पुस्तक प्रकाशित व्हावं अशी त्यांची इच्छा होती.

24 मे 1956 ला आपण ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा केली. बाबासाहेबांची प्रकृती खंगतच चालली होती. 

दीक्षासमारंभ कुठे करायचा यावर चर्चा सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांनी नागपूर हे स्थळ निवडलं. बुद्धधर्मीय नागलोक यांची ती पुण्यभूमी आहे त्यामुळे बौद्ध धर्माचं चक्र गतिमान कऱण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली. जर सर्व भक्तांनी धर्मांतर केलं नाही तर कसं ही भीती एकाने व्यक्त केली तेव्हा आता धर्मांतराचा विषय पुढे ढकलू शकत नाही ज्यांना माझ्याबरोबर धर्मातर करायचं आहे त्यांनी ते करावं असं बाबासाहेब म्हणाले.

23 सप्टेंबर 1956 ला त्यांनी एक पत्रक काढलं आणि 14 ऑक्टोबर 1956 ला आपण धर्मांतर करत असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी तेव्हाचे सर्वात वयोवृद्ध भिक्खु महास्थविर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आलं. आंबेडकर आणि त्यांची पत्नी 11 ऑक्टोबरला नागपुरात आले. बाबासाहेब नागपूरला आल्याचे कळताच अस्पृश्य वर्गाचे अनेक लोक आठवडाभरापासून नागपुरात येऊ लागले. अनेकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी केले, 'बाबासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार' अशा घोषणा नागपुरात दुमदुमल्या.

धर्मांतर दिन विशेष भीम गीतांचे Lyrics 

......आणि तो दिवस उजाडला

14 ऑक्टोबर ला सकाळी प्रात;काळी उठले. कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सदरा, पांढरे धोतर परिधान करून डॉ.आंबेडकर सकाळी श्याम हॉटेलमधून दीक्षाभूमीवर यायला निघाले. तिथे पोहोचताच प्रचंड जनसमुदायाने त्यांचं स्वागत केलं. जेव्हा ते व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाटाने आसंमत निनादून गेला.

व्यासपीठावरच्या एका टेबलावर बुद्धाची लहान मूर्ती ठेवण्यात आली होती. त्याच्या बाजूंना दोन वाघ होते. व्यासपीठावर धर्मोपदेशक बसले होते. समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली. नंतर चार भिक्षू आंबेडकर आणि त्यांची पत्नी त्यांना 'बुद्धं शरणं गच्छमि', 'संघं शरणं गच्छमि' हे मंत्र म्हणवून घेतले.

जीवहत्या, चोरी, असत्य भाषण, अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहण्याविषयीची पंचशीले म्हणवून घेत असताना तीन लाखांचा समूह तो सोहळा तन्मयतेने पाहत होता. आंबेडकर शपथ घेताना बुद्धाच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने नतमस्तक झाले. भगवान बुद्धाच्या चरणी मस्तक ठेवून तीन वेळा वंदन केले.

बुद्धमूर्तीला कमलांचा पुष्पहार वाहिला. हे झाल्यावर आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित करण्यात आलं. त्याबरोबर 'बाबासाहेब आंबेडकर की जय', 'भगवान बुद्ध की जय' असा जयजयकार करण्यात आला आणि विजयादशमीच्या मुहुर्तावर बाबासाहेबांचे सीमोल्लंघन झाले.

धर्मांतर सोहळ्याचे Original Photos पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

हा सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली की, "मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेला नाही, मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन. बौध्द धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन" त्यानंतर ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं रहावं असं आव्हान त्यांनी जनसमुदायाला केलं.

जनतेचा तो समुदाय उभा राहिला. त्यांना पाच शपथा, पंचशील आणि बावीस शपथा म्हणावयास सांगितल्या. त्यादिवशी जवळजवळ तीन लाख लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

बाबासाहेबांच्या कृतीचा परिणाम.

दलितांच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं. आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मात्र त्यानंतर अगदी 50 दिवसात त्यांचा मृत्यू झाला.

बाबासाहेबांच्या या कृतीचा बौद्ध धर्मावर झालेल्या परिणामाविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट पूर्ण झालं नाही. 14 ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात आंबेडकरांना सहभागी होता आलं नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचं आचरण करण्यात येतं पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. ज्या पद्धतशीर पद्धतीने व्हायला हवं होतं ते झालं नाही हे मान्य करावं लागेल."

1935 साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्ष कृती करायला त्यांनां 21 वर्षं जावी लागली. या काळात त्यांनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला आणि शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

त्यांच्या या कृतीची आठवण म्हणून अजुनही दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. दीक्षाभूमी हे नागपुरातील आणि भारतातील एक महत्त्वाचं स्थळ आहे. हजारो वर्षाच्या दडपशाही विरुद्ध केलेल्या एल्गाराचे ते प्रतीक आहे. आज 68 वर्षानंतरही बाबासाहेबांची कृती अनेकांना प्रेरणा देते आणि देत राहील.

Dr Babasaheb Ambedkar यांचे 300+ Original Photos साठी येथे क्लिक करा 

या लेखा मध्ये काही चुक झाली असेल तर खाली दिलेल्या E-mail वर आम्हाला कळवा.

जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम 

आम्हाला Instagram वर फॉलो करा!

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)