छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा - महात्मा फुले भाग - 1 |छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा | Chhatrapati Shivaji Maharaj Powada
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन क्रांतीसुर्य महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.
छ. शिवाजी राजांचा पोवाडा
कुळवादी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥
लंगोटयांस देई जानवीं पोषींदा कूणब्यांचा ।
काळ तो असे यवनांचा ॥
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा ।
असे तो डौल जाहगिरिचा ॥
पंधराशें एकूणपन्नास साल फळले।
जुन्नर ते उदयासी आलें ॥
शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें ।
जिजाबाईस रत्न सांपडलें ॥
हातापायांची नख बोट शुभ्र प्याजी रंगीलें ।
ज्यानी कमला लाजिवलें ॥
वर खाली टि-या पोट-या गांठी गोळे बांधले ।
स्फटिकापरि भासले ॥
सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें ।
नांव शिवाजी शोभलें ॥
राजहौसीं उंच मान माघें मांदे दोंदीले ।
जसा का फणीवर डोले ॥
एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले ।
मोतीं लडी गुतिवलें ॥
रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवलें ।
म्हणोन बोबडे बोले ।
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां ताणीले ।
ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें ।
कुरळे केस मोघीले ॥
आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले ।
चिन्ह गादिचे दिसलें ॥
जडावाचीं कडीं तोडे सर्व अलंकार केले ।
धाकटया बाळा लेविवले ॥
किनखाबी टंकोचें मोतीं धोसानें जडले ।
कलाबतुचे गोडें शोभले ।
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले ।
डाग लाळीचे पडलेले ॥
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे ।
पायीं घुगरुं खुळखुळे ॥
मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले
खेळण्यावर डोळे फिरविले ॥
मजवर ही कसा खेळणा नाहीं आवडलें ।
चिन्ह पाळणीं दिसलें ॥
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले ।
पाळण्या हालवूं लागले ॥
धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केले ।
गातों गीत तिनें केलें ॥
॥चाल॥
जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जिजी गाऊं ।
चला वेरुळास जाऊं, दौलताबाद पाहूं ॥
मूळ बाबाजीस ध्याऊं, किती आनंदाने गाऊं ।
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥
पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ ।
थोर विठोजी नांव घेऊं, सान मालोजी त्याचा भाऊ ।
दीपाबाई त्याद देऊं, छंदाजोगा गितीं गाऊं ॥
॥चाल॥
मालोजी राजा । तुझा बा आजा ॥
यवनी काजा । पाळिल्या फौजा ॥
लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ॥
वेळेस मुक्का । साधल्या बुक्का ॥
विचारी पक्का । जाधवा धक्का ॥
शेशाप्पा नायका । ठेविचा पैका ॥
द्रव्याची गर्दी । चांभारगोंदी ॥
देवळें बांधी । तळीं ती खांदी ॥
आगळी बुद्वी । गुणानें निधि ।
लिहिलें विधि । लोकांस बोधी ॥
संधान साधी । जसा पारधी ॥
भविषी भला । कळलें त्याला ॥
सांगोनी गेला । गादी बा तुला ॥
उपाय नाहीं जाणीन चाकर झाला यवनाचा ।
शिपाई होता बाणीचा ॥
खॊठया दैवा कोण खोडी बेत देवाजीचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥1॥
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भाग - 2 साठी येथे क्लिक करा!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवड्याचे सर्व भाग साठी येथे क्लिक करा!
या लेखा मध्ये काही चुक झाली असेल तर खाली दिलेल्या E-mail वर आम्हाला कळवा.
जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम
आम्हाला Instagram वर फॉलो करा!
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
ReplyDelete